ठाणे : दिल्लीतील निर्भया आणि पुण्यातील नयना पुजारी या दोघींवरही झालेल्या गँगरेप प्रकरणी  न्यायालयाने गेल्याच आठवड्यात दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली. त्यानंतर कचरावेचक तरुणींवर ठाण्यात झालेल्या सामुहिक बलात्कार आणि एकीच्या हत्येप्रकरणीही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


नोकरीच्या आमिषाने दोन कचरावेचक तरुणींवर सामूहिक बलात्कार करुन एकीची हत्या करणाऱ्या दोघा नराधमांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा ठोठावली. रहिमुद्दीन महफूज शेख उर्फ बाबू उर्फ बाबा (24) आणि संदीप समाधान शिरसाठ उर्फ रघू रोकडा (20) अशी फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्येसाठी वापरलेली हत्यारे, फिर्यादी आणि 11 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून दोघांना दोषी ठरवण्यात आलं. दोघांनाही कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, कलम 376 अन्वये जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसंच कलम 326 अन्वये दहा वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दंडातील 15 हजार रुपयांची रक्कम मयत तरुणीच्या वारसांना, तर उर्वरित 15 हजार रुपये पीडित फिर्यादीला देण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

काय आहे प्रकरण?

9 मे 2012 रोजी घाटकोपर येथील विद्या बनसोडे ही 28 वर्षीय तरुणी नवी मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीकडे आली होती. दोघीही कचरावेचक होत्या. दोघी वाशी रेल्वे स्टेशनजवळ बसथांब्यावर प्रवाशांकडे पैसे मागत असताना आरोपींनी त्यांना नोकरी देण्याचं आश्वासन देऊन रिक्षाने मुंबई-पुणे हायवेमार्गे जुईनगर ब्रिजजवळ नेलं.

तिथे रिक्षा सोडून आरोपी दोघींना सीबीडी येथील बोगद्यात घेऊन गेले. तिथे दोघांनी दोन्ही तरुणींवर सामूहिक बलात्कार केला. तसंच दोघींवरही तीक्ष्ण हत्याराने वार केले. विद्याच्या शरीरावर 8 ते 10, तर तिच्या मैत्रिणीच्या शरीरावर 11 ते 12 वार करण्यात आले होते. 2012 मध्ये नवी मुंबईतील सीबीडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती.

विद्याची मैत्रिण घटनास्थळावरुन पळून जात असताना काही अंतरावर जाऊन बेशुद्ध पडली, तर विद्याचा जागीच मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू झाल्याचे समजून हे दोघे आरोपी पळून गेले. एका रिक्षाचालकाने विद्याच्या मैत्रिणीला रुग्णालयात नेलं. ती शुद्धीवर आल्यानंतर 10 मे रोजी या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पीडित आणि आरोपी अशा चौघांना तेथील एका सुरक्षारक्षकाने एकत्र पाहिले असल्याचे पोलिसांना सांगितले होते. तसंच त्यापैकी बाबू नावाच्या व्यक्तीला ओळखत असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्यानुसार 14 मे 2012 रोजी नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडे, हत्यारे जप्त केली.