मुंबई : शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. आता मनसेच्या महिला आघाडीने दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे.


“शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करुन बळीराजाची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस दिलं जाईल.”, अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.

“दानवेंच्या तोंडातून येणारी वाक्य ही सत्ताधाऱ्यांना आलेला माज असून रावसाहेब दानवेंची तात्काळ प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा नवी मुंबईत रावसाहेब दानवेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही.”, असा इशाराही नवी मुंबई महिला सेना उपशहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांनी दिला आहे.

काय आहे वक्तव्य?

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. कापसाला, तुरीला, डाळीला भाव नाही असली गाणी बंद करा, अशी मुक्ताफळं दानवेंनी उधळली. याशिवाय दानवे यांनी असंसदीय भाषेचा वापरही केला होता.

आधी मुक्ताफळं, नंतर माफीनामा

शेतकऱ्यांना हिणवणारं वक्तव्य केल्याप्रकरणी अखेर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली. ‘शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरलेला नाही, मात्र त्यांची मनं दुखावली गेली असल्यास, दिलगिरी व्यक्त करतो’ अशा शब्दात दानवेंनी खेद व्यक्त केला.