ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील पार्किंग परिसरात गुरुवारी पहाटे ही घटना घडली होती. अपहृत चिमुरडीला तिच्या आईकडे सुखरुप सुपूर्द करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक 10 बाहेरील पार्किंग भागात राधा अंबादास मुळेकर ही कचरावेचक महिला दोन लहानग्या मुलांसह झोपली होती. तिच्या दीड वर्षीय पूजा या मुलीचं पहाटेच्या सुमारास अपहरण झाल्याची माहिती कोपरी पोलिसांकडे आली.
VIDEO | अपहरण झालेल्या डॉ. संजय राऊत यांची पहाटेच्या सुमारास सुखरुप सुटका | सातारा
त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेल्वे स्टेशनचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं आणि इतर कचरावेचकांकडे चौकशी सुरु केली. त्यावेळी एका 15 वर्षीय मुलाने झोपी गेलेल्या लहानग्या पूजाला उचलून नेल्याचं पोलिसांना समजलं. तपासाची चक्रं फिरवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र आगरकर आणि पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सकपाळे आणि शिंदे यांनी विकी नावाच्या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतलं.
त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर वर्तकनगरमध्ये राहणाऱ्या अपहरणकर्त्या शाहिस्ता शेखचा छडा लागला. तिच्या नातेवाईकाकडे लपवून ठेवलेल्या मुलीची सुखरुप सुटका करुन बाळाला मातेच्या स्वाधीन करण्यात आलं. घरकाम करणारी आरोपी महिला शाहिस्ता ही विवाहित असून मूळची गोवंडी येथील राहणारी आहे. तिने चिमुकलीचं अपहरण का केलं, याची चौकशी सुरु आहे.