Thane Coronavirus Update : गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन आणि शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँन्टीजन चाचणी करण्याचं ठाणे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले होते. या आदेशानुसार मंगळवारी पाच दिवसांच्या गौरी-गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आलेल्या 2,552 भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे. एकूण 24 ठिकाणी महापालिकेचं अँटीजन टेस्टिंग केंद्र उभारण्यात आलं होतं. यामध्ये फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली असून यापुढे सातव्या आणि दहाव्या दिवशीही भाविकांची टेस्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केलं आहे.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं 24 विसर्जन घाटांवर अँन्टीजन चाचणी केंद्रं उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. काल पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी आलेल्या 2,552 भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली असून फक्त एकाच व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी 1,192 भाविकांची चाचणी करण्यात आली होती, त्यात देखील एक जण पॉझिटीव्ह सापडला होता. अशी आतापर्यंत एकूण 3744 भाविकांची अँटीजन चाचणी करण्यात आली आहे, ज्यात एकूण 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. हीच मोहीम सातव्या आणि दहाव्या दिवशीच्या विसर्जनावेळी देखील सुरु असणार असल्याचं पालिकेनं सांगितलं आहे. 
          
विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती 


गणेश विसर्जनाच्या पाचव्या दिवशीही ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण 14,123 गणेशमुर्तींसह 964 गौरींचं महापालिकेच्या नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झालं. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीनं निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचं आणि गौरीचं विसर्जन केलं. तसेच महापालिकेच्या गणेशमुर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 600 गणेश मुर्तींचं महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आलं. पाचव्या दिवशी 3668 नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचं विसर्जन केलं.