लोकलमध्ये जागेवरुन वाद, प्रवाशांवर मिरची पूड फेकली
एबीपी माझा वेब टीम | 20 Jun 2017 11:27 PM (IST)
ठाणे : लोकलमध्ये जागेवरुन झालेल्या वादामुळे एका व्यक्तीनं प्रवाशांच्या डोळ्यावर मिरचीची पूड फेकली आहे. मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनवर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. टिटवाळा लोकलमधल्या काही प्रवाशांशी 27 वर्षीय आरोपी दीपक गावडेचा जागेवरुन वाद झाला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपी आधी शहाड रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उतरला. ज्यांच्याशी भांडण झालं होतं, ते प्रवाशी लोकलच्या गेटवरच उभे होते. त्यामुळे जेव्हा लोकल पुढे निघाली त्याचवेळी फलाटावरुन आरोपीनं मिरचीची पूड फेकली. मिरची पूड अंगावर पडल्याने सात प्रवाशांना डोळे आणि शरीरावर जळजळ झाली. कल्याण रेल्वे स्टेशनवर त्यांना रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि डिस्चार्जही देण्यात आला. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली.