नवी मुंबई : खासदार राजू शेट्टी मतदारसंघातील काही कामं घेऊन आज मंत्रालयात आले होते. अधिकाऱ्यांशी गाठी-भेटी करून निघत असताना त्यांना पत्रकारांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गराडा घातला.
कालच्या बैठकीत सरकारसोबत झालेली हमरीतुमरी, कर्जमाफीसाठीचे जाचक निकष आणि देशव्यापी आंदोलनाबाबत राजू शेट्टी माहिती देत होते. तेवढ्यात त्याठिकाणी काम उरकून निघत असलेले राज्यमंत्री सदाभाऊ खोत पोहोचले.
एकेकाळी खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करणारे सहकारी आज परक्यासारखे आमने-सामने उभे ठाकले होते. आज या दोघांमध्ये विस्तवही जात नाही हे सांगायला ते चित्र पुरेसं बोलकं होतं. सदाभाऊ काही अधिकऱ्यांसोबत गाडीची वाट पाहत होते, तर राजू शेट्टी काही कार्यकर्ते आणि पत्रकारांशी गप्पा मारत होते. मात्र दोघांनीही एकमेकांडे वळूनही पाहिलं नाही, असा प्रत्यक्षदर्शींचा दावा आहे.
यादरम्यान, शेतकरी नेते पाशा पटेल तिथे आले आणि दोघांना, 'घ्या की जुळवून आता' अशी साद घातली. मात्र, तरीही दोघांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर सदाभाऊंची गाडी आले आणि ते त्यांच्या मार्गी निघून गेले.
गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ यांच्यातलं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. त्यात सदाभाऊंनी राजू शेट्टींना अडचणीच्या काळात मदतीसाठी दिलेल्या अडीच लाख रुपयांची परतफेड करून आणि खरमरीत पत्र लिहून हिशेब चुकते केलेत. त्यामुळे सत्तेच्या या मैदानात जीवाभावाची माणसं कशी परकी होतात याचं दर्शन अवघ्या महाराष्ट्राला घडतं आहे.