ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे महापालिकांच्या विकासकामांचा उद्घाटन सोहळा करणार आहेत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.


येत्या शनिवारी, म्हणजे सात एप्रिलला विकासकामांचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र उद्धव ठाकरे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे उद्धव यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री उद्घाटन करतील.

ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नसताना देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन केलं जात असल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

या कार्यक्रमाची पूर्वकल्पना उद्धव ठाकरेंना दिली नव्हती का? असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. सात एप्रिलचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मातोश्रीवरुनआले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सहा एप्रिलला स्थापना दिनानिमित्त भाजप मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहे, तर सात एप्रिलला विकासकामांच्या उद्धाटनाच्या निमित्तानं ठाण्यात शक्तिप्रदर्शन करण्याची भाजपची तयारी आहे.