मुंबई : विवाहबाह्य संबंधातून विवाहित प्रेयसीच्या पतीच्या हत्येचा कट रचणाऱ्या विवाहित प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बडोद्यात राहणाऱ्या प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याचा डाव आखलेल्या ठाण्यातील व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.
मंगळवारी रात्री ठाण्यात बसने बडोद्याला निघालेल्या दोघांसह 27 वर्षीय सूत्रधाराला पोलिसांनी गजाआड केलं. दोघा साथीदारांपैकी एकाकडून बंदूक, तर दुसऱ्याकडून खेळण्यातील बंदूक जप्त करण्यात आली. तिघांवर कलम 115 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
आरोपी निलेशचं लग्न झालं असून त्याला सहा महिन्यांचं बाळ आहे. ठाण्यातील एका महिलेशी त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले, तिचं लग्न दीड वर्षांपूर्वी बडोद्यातील इसमाशी झालं आहे. दोघंही एकमेकांच्या संपर्कात होते. आपला पती क्रूर असून छळत असल्याचं तिने निलेशला सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रेयसीचे हाल पाहवत नसल्याने निलेशने तिची पतीच्या तावडीतून सुटका करण्याचा चंग बांधला. निलेशने भाडोत्री शूटर्सशी संपर्क साधला. महिलेच्या पतीची हत्या करण्यासाठी त्याने निलेशकडे चार लाख रुपयांची मागणी केली. निलेशने 70 हजार रुपयांचा पहिला हप्ता दिल्यानंतर शस्त्र विकत घेण्यात आलं.
पोलिसांना याची माहिती मिळताच पाळत ठेवून त्यांनी मुख्य सूत्रधार आणि दोन साथीदारांना अटक केली. आरोपी निलेशने आपल्या प्रेयसीला याबाबत काहीच कल्पना नसल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिस अधिक तपास करत आहेत. तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.