ठाणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय भालेराव यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. भालेरावांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार आल्यानंतर ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. त्यांची सर्व बँक खाती, मालमत्ता जप्त करण्याचे काम पोलिस करत आहेत. एस. डी. भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनीचे भागीदार विजय अग्रवाल आणि अक्षय रुईया यांच्या तक्रारीवरुन हे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 22 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अग्रवाल आणि 31 कोटी रुपये दिले नाहीत म्हणून रुईया यांनी भालेराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संजय भालेराव यांच्या एस डी भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनीने गेल्या 20 वर्षात मोठी झेप घेत अनेक बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते आणि ते पूर्णही केले. व्हीजेटीआयमधील इंजिनिअर असलेल्या भालेराव यांनी 1991 मध्ये एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु केली. सुरुवातीला बीबीटीपी, सिडको, रेल्वेची कामं करणाऱ्या भालेराव यांनी 1999 मध्ये आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड केली. बँकेची नोकरी सोडून त्यांची पत्नीही कंपनीत भागीदार झाली. ठाणे, कुर्ला, अंधेरी, पिंपरी, मुलुंड अशा ठिकाणी विविध गृहनिर्माण प्रकल्प उभारले. सुमारे 32 प्रकल्पांच्या माध्यमातून गृहनिर्माण उद्योगात नाव कमावले होते. ठाण्यातील वर्तकनगर येथील म्हाडा कॉलनीतील काही जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि त्यांना उतरती कळा लागली.


भालेराव यांनी 100 कोटींच कर्ज काढून हाती घेतलेल्या प्रकल्पाला मंजुरीच न मिळाल्याने त्यांचा प्रकल्प रखडला आणि बँक, गुंतवणूकदार यांनी त्यांच्याकडे पैसे वसुलीसाठी तगादा लावला. बँक ऑफ इंडियाने तर एक इमारत जप्त करुन साडेसात कोटींची वसुली केली. अशाप्रकारे गुंतवणूकदारांच्या रकमा वाढू लागल्या. त्यातून एक मालमत्ता विकून दुसर्‍यांचे कर्ज फेडण्याची साखळी सुरु झाली आणि त्या साखळीत भालेराव अडकले. विजय अग्रवाल यांनी 22 कोटी आणि अक्षय रुईया यांनी 31 कोटी रुपये गुंतवले होते. त्याच्या मोबदल्यात काही फ्लॅट हे मॉर्गेज ठेवण्यात आले. या दोघांनाही ठरल्याप्रमाणे व्याजही मिळणे बंद झाल्यानंतर मॉर्गेज प्रॉपर्टीची माहिती घेतली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. ती मालमत्ता अन्य व्यक्तीला देण्यात आली होती. वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर दोन्ही फिर्यादींनी भालेराव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी अजून तपास सुरु आहे. भालेराव यांनी आणखी कोणाकडून पैसे घेतलेत, याची चौकशी करुन त्यांचं बँक अकाऊंट आणि मालमत्ता सील करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. तसेच अशा पैशांच्या व्यवहारात पडताना काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांनी  केले आहे.