मुंबई : मुंबईत हक्काचं घर घ्यायला 'म्हाडा'चे फॉर्म भरलेल्या इच्छुकांसाठी आज स्वप्नपूर्तीचा दिवस ठरु शकतो. मुंबईतील म्हाडाच्या सदनिकांची सोडत आज जाहीर होणार आहे. 217 सदनिकांसाठी सुमारे 66 हजार जणांनी यावेळी अर्ज केले होते. यंदाच्या सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी चेंबुरच्या सहकार नगरमधील 170, तर मध्यम उत्पन्न गटासाठी 47 सदनिकांचा समावेश आहे. वांद्र्यातील म्हाडा मुख्यालयाच्या प्रांगणात वेबकास्टिंगद्वारे सकाळी दहा वाजता सोडत काढण्यात येणार असून त्याचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

मुंबई मंडळातर्फे विविध गृहप्रकल्पांमधल्या 217 सदनिकांच्या विक्रीसाठी 6 मार्चला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 13 एप्रिल 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू आचारसंहितेमुळे या वेळापत्रकात बदल करण्यात आला. त्यानुसार अर्ज नोंदणी आणि अर्ज सादर करणे, ऑनलाईन पेमेंट आणि आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 24 मे 2019 पर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. या काळात 66 हजार 84 अर्ज प्राप्त झाले.



म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेबकास्टिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचं घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
घरांची सोडत


मध्य उपन्न गट (MIG )

पवई - 46 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 01 घरं


अल्प उत्पन्न गट (LIG)

सहकार नगर चेंबूर 2 - 64 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 41 घरं

सहकार नगर चेंबूर 23 - 13 घरं

सहकार नगर चेंबूर 37- 52घरं