ठाणे : नवी मुंबई-ठाणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे 4 दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. कारण रस्ते दुरुस्तीसाठी बेलापूर-ठाणे मार्ग सोमवारपर्यंत बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. कारण उरण-बेलापूर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्याने सोमवारपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे. कळवा- विटावा रेल्वे ब्रीजखालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्याने ही पुरिस्थिती उद्भवलीय आहे.
या मार्गांवरील वाहतुकीत बदल
रस्ता दुरुस्तासाठी नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पटनी कंपनीपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन धारकांना ऐरोली आणि पुढे मुलुंडमार्गे ठाणे गाठावं लागणार आहे. या फेऱ्यामुळे ऐरोली आणि मुलुंड या दोन्ही ठिकाणी टोलचा भुर्दंड बसणार आहे.
मनसेने टोलवसुली बंद पाडली
ऐरोलीमार्गे वाहतूक वळवण्यात आल्याने प्रवाशांना नाहक टोलचा भुर्दंड बसत आहे. शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. मनसेने याविरोधात आंदोलन करत ऐरोली टोलनाक्यावरील टोल वसुली बंद पाडली आहे.
हार्बर मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते नेरुळ दरम्यान तीन दिवस मेगाब्लॉक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना वाहनाने ठाणे-मुंबई गाठावं लागणार आहे. नेरुळ ते ठाणे हा ट्रान्सहार्बर मार्ग चालू राहिल. पण पनवेल ते सीवूड्स-दारावे या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेरुळला यावं लागणार आहे.
कोणत्याही नवीन रस्ताचं मूळ रुप अवघ्या काही वर्षांत उघड पडतं. त्यासाठी कोण जबाबदार असतं हे सर्वश्रूत आहे. मात्र त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आणि अशातच लाखो जण प्रवास करत असलेला रस्ता चार दिवस बंद ठेवणं हे कितपत योग्य आहे, याचा प्रशासनाने सारासार विचार करणं आवश्यक आहे.