कल्याण : नवविवाहित जोडप्याने वाटलेले पेढे खाल्ल्यामुळे 34 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरबाड-शहापूर रस्त्यावरील आदिवासी पाड्यात हा प्रकार घडला.


मुरबाड-शहापूर रस्त्यावर संगम पाडा नावाचा आदिवासी पाडा आहे. जवळच दोन नद्यांच्या संगमावर शंकराचं मंदिर आहे. या मंदिरात काल पुण्याच्या एका जोडप्याने लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी जवळच्याच संगम पाड्यातल्या ग्रामस्थांना पेढे वाटले आणि निघून गेले.

पेढे खाल्ल्यानंतर काही वेळातच 34 ग्रामस्थांना उलट्या, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला. सुरुवातीला त्यांना सरळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर त्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आलं.

बाधितांमध्ये महिला आणि लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत