ठाणे : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अनेक व्यापारी, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून खंडणी वसूली, जीवे ठार मारण्याची धमकी, हत्येचा प्रयत्न, गोळीबार आणि हत्येच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या गँगस्टर सुरेश पुजारी याला ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर बुधवारी त्याला ठाणे न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने खंडणीखोर सुरेश पुजारील २५ डिसेंबर पर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सुरेश पुजारीला फिलीपाईन्स या देशातून अटक करून नवी दिल्ली येथे आणण्यात आले होते. तिथे महाराष्ट्र पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि आज त्याला मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर ताबडतोब ठाणे एटीएसने कल्याण येथील महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या 50 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले.

     

ठाणे एटीएसने ताब्यात घेतलेल्या सुरेश पुजारीने मुंबई आणि ठाण्यात खंडणीचा धुमाकूळ घातला होता. मुंबई आणि ठाण्यात त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण ३८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात खंडणी, धमकावणे, गोळीबार करणे, हत्या करणे सारख्या गुन्ह्यांचा सहभाग आहे. तर या ३८ गुन्ह्यांपैकी तब्बल पाच पोलीस ठाण्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही हि करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. खंडणीखोर गँगस्टर सुरेश पुजारी याच्या विरोधात २० डिसेंबर २०१६ रोजी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली होती. या नोटीसची मुदत १९ डिसेंबर २०२१ पर्यंत वैध होती. ती संपण्याआधिच त्याला फिलिपाईन्स देशात अटक करण्यात आले. 2 महिने तो तिथेच अटकेत होता. त्याचा ताबा मिळवण्यास अखेर काल यश आले. सुरेश पुजारीकडून दोन आंतरराष्ट्रीय सिमकार्ड ताब्यात घेण्यात आलेले आहेत. 

 


आरोपी सुरेश पुजारी

 

कोण आहे सुरेश पुजारी?

 

एकेकाळी रवी पुजारी सोबत खंडणी उकळण्याचा धंदा करणाऱ्या सुरेश पुजारीने गुन्हेगारी विश्वात पहिला गुन्हा करण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केला होता. त्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये सुरेश पुजारीने एंट्री केली. त्यानंतर रवी पुजारीपासून अलिप्त होऊन स्वतःचे शार्पशुटर आणि नेटवर्क उभे करून खंडणी वसुलीचा धंदा सुरेश पुजारीने सुरु केला. बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, पुंजीपती आदींच्या मागे लागून कोट्यवधींच्या खंडणीचा ससेमिरा सुरेश पुजारीने लावला. नकार देणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी किंवा हस्तकांकडून गोळीबार करणे किंवा हत्या घडवून आणण्याचे गुन्हे सुरेश पुजारीवर दाखल आहेत. 1995 साली उल्हासनगर परिसरातील डायमंड बार आणि ढाब्यावर वेटरचे काम करणारा सुरेश पुजारी हा बघताबघता खंडणीखोर आणि गँगस्टर झाला. त्याने ठाणे शहराव्यतिरिक्त, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, कल्याण आणि उल्हासनगरसह नवी मुंबईच्या विविध भागात अनेक पुंजीपतीना खंडणीसाठी त्याने धमकावले. कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीने अनेक नामचीन बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी उकळली. त्याने उल्हासनगरमध्ये सच्चानंद करीरा या केबल व्यावसायिकाने खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर त्याची हस्तका करवी हत्या केली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांसह भाजप आमदारालाही खंडणी आणि धमकी दिल्याच्या तक्रारी सुरेश पुजारीवर आहेत. 

हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha