नवी मुंबई : नवी मुंबईतील (navi mumbai nri complex) पामबीच रोडवरील एनआरआय या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोसायटीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे एका मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण सोसायटीच्या (society rules) आवारात भटक्या कुत्र्यांना लगाम घालण्यासाठी तब्बल 5 हजार ते 50 हजारांपर्यंत दंड ठोठावण्याचा निर्णय सोसायटीने घेतला होता. ज्यानंतर एका सोसायटीतील एका महिलेला एकूण 8 लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. सोसायटीमध्ये फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे घाण पसरत असून चावण्याच्या घटना वाढू लागल्याने हे पावूल उचलावे लागल्याचे स्पष्टीकरण सोसायटी कमिटीने दिले आहे.


नवी मुंबईतील पामबीच रोडवर एनआरआय सोसायटीचा परिसर तब्बल 45 एकर इतका असून याठिकाणी 40 इमारती आहेत. सोसायटीमध्ये जवळपास 30 ते 35 भटकी कुत्री फिरत असतात. दरम्यान या भटक्या कुत्र्यांना वैतागून सोसायटी कमिटीने भटक्या कुत्र्यांना जेवण दिलं म्हणून दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर काही श्वानप्रेमींना लाखोंचा दंड ठोठावला गेला आहे. सोसायटीतील रहिवाशी अंशू सिंग यांना 8 लाख 12 हजार तर मोना मोहन यांना 6 लाख आणि लिला वर्मा यांना 55 हजाराचा दंड ठोठावला गेला आहे. एका वेळी जेवण खाऊ घातल्यााने 5 हजार असे मागील मे महिन्यापासूनचे पैसे ठोठावण्याक आल्याने अंशू सिंग यांचा दंड 8 लाखांच्या वर गेला आहे. दरम्यान यामुळे संबधित श्वानप्रेमींनी ॲनिमल व्हेलफिअर बोर्ड ॲाफ इंडियाकडे मदत मागितली. पण या संस्थेने याबाबत सोसायटी पदाधिकारी यांना लेखी आदेश पाठवूनही ते पाळले जात नसल्याचा आरोप श्वानप्रेमींकडून केला जात आहे.


सोसायटीमध्ये खायला दिल्याने दंड - सोसायटी कमिटी


सोसायटीमध्ये भटके कुत्रे फिरत असल्याने परिसरांत दुर्गंधी, घाण होत आहे. लहान मुलांना, वृध्दांना कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत. तसंच रात्री मोठ्या आवाजाने कुत्रे भूंकत असल्याने त्रास होत असल्याचा आरोप सोसायटी कमिटीने केला. तसंच सोसायटीच्या बाहेर तीन ठिकाणी शेड बांधून कुत्र्यांची सोय केली आहे. मात्र श्वानप्रेमी तरीही सोसायटीमध्येच जेवण देत असल्याने हा दंड लावण्यात आल्याचे स्पष्टीकरण सोसायटी कमिटीने दिले आहे.




हे ही वाचा