औरंगाबाद : दहा रुपयांच्या रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रिक्षा भाड्यावरून झालेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मारहाण केलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सुलेमान बावजीर हा मुख्य बसस्थानक परीसरात आपली रिक्षा ( क्रमांक एमएच 20 इएफ 0013 ) घेऊन उभा होता. त्यावेळी मिर्झा मुजफर हे सिटी चौकात जाण्यासाठी बाबा यांच्या रिक्षात बसले. त्यानंतर सिटी चौकात उतरताना रिक्षा चालक बाबा याने 20 रुपये भाडं मागितलं. मात्र मिर्झा यांनी 10 रुपयेच भाडं असल्याचं सांगितलं. यावरून दोघांत वाद झाला. या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. त्यात रिक्षा चालकाने मिर्झा यांच्या नाकावर मारल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मारहाण झाल्यानंतर मिर्झा यांच्यावर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या नाकावर जोरात मार लागल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी मृत मिर्झा मुजफर यांचा भाचा मिर्झा मुझफ्फर हुसैन यांनी सिटी चौक पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बाबा याला पोलिसांनी अटक केली आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या