Sanjay Raut on Shinde Fadnavis Government: नागपूर (Nagpur News) शहरात शनिवारी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सडकून टीका केली आहे. नागपुरात हाह:कार सुरू होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शाहांसोबत गणेशदर्शन करत होते, अशी टीका झाल्यावर ते नागपूरला गेले, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.  


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, "नागपुरातील पावसानं किमान 10 हजारांहून अधिक घरांचं नुकसान झालेलं आहे. अनेक लोकांची घरं पाण्याती गेली, बंगले पाण्यात गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःला नागपुरचे सुपुत्र मानतात, पण ज्यावेळी नागपुरात या प्रलयाचा हाह:कार सुरू होता, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत गणेश दर्शनामध्ये अडकून पडले होते आणि त्यांच्यावर टीका झाली, त्यावेळी ते नागपुरात गेले. मुंबई सांभाळता येत नाही, असं आम्हाला नेहमीच म्हटलं जातं. पण कोरोना असो वा प्रलय किंवा मग लॉकडाऊन... शिवसेनेनं मुंबई उत्तमरित्या सांभाळली आहे." 


देवेंद्र फडणवीसांना भेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या आपातग्रस्तांना धक्के मारून बाजूला करण्यात आलं, राऊतांचा थेट आरोप 


कोरोना काळात सर्वाधिक हाह:कार नागपुरात झाला आणि कालच्या प्रलयात महिला, आपातग्रस्त देवेंद्र फडणवीसांना भेटण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना धक्के मारून बाजूला करण्यात आलं, त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही, हे चित्र पाहायला मिळालं. आम्हाला याचं राजकारण अजिबात करायचं नाही, जे भाजपनं वारंवार केलंय, असं म्हणत संजय राऊतांनी थेट निशाणा साधला. 


काय नागपूरचा विकास? नागपूरची रचना... कुठंय? केवळ चार तासांच्या पावसात अवघं नागपूर बुडून गेलं, वाहून गेलं... लोकांची घरं, दारं, संसार वाहून गेले. सरकार, नागपूरचे तथाकथित सुपुत्र हे त्याच मुंबईत राजकारण करत होते. ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे सरकार अमानुष अन् संवेदनशून्य आहे. मी केवळ विरोधी पक्षाचा नेता म्हणून टीका करत नाही, नागपूरला लोक काय भोगतायत, याची माहिती आम्ही दररोज घेत आहोत. सरकार पूर्णपणे अपयशी आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस वारंवार शिवसेना आणि मुंबईवर टीका करतात, त्यांना अधिकार आहे का? मुंबईसाठी आम्ही ठामपणे उभे राहिलो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात आम्ही मुंबई वाचवली आणि हे पळून गेले, असं म्हणत राऊतांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 


पाहा व्हिडीओ : Sanjay Raut PC Full : विधानसभा अध्यक्षांनी शिंदे सरकारला प्रोटेक्शन दिलंय, राऊतांच गंभीर आरोप