मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून आगामी दसरा मेळाव्यासाठी (Shivsena Dasara Melava) गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता यावर्षी एक महिना अगोदरच मुंबई महानगरपालिकेला शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाकडून सावध भूमिका घेत एक महिन्यापूर्वीच शिवाजी पार्क मैदानासाठी दावेदारी निश्चित केली आहे. गेल्यावर्षी दसरा मेळाव्याला मैदान देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली. त्यानंतर न्यायालयाने बीएमसीला दिलेल्या दणक्यानंतर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर पार पडला होता. 


गेल्यावर्षी शिवाजी पार्क मैदानावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले होते. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी (Shivsena Dasara Melava) शिवाजी पार्क मैदान मिळण्यासाठी सावध पावले उचलण्यात आली आहेत. ठाकरे गटाने अर्ज करताना या वर्षी देखील आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे ठाकरे गटाचं वैभव राहिलं आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी येत असतात. मात्र गेल्यावर्षी शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाळीने दोन गट झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी दोन मेळावे झाले होते. एकनाथ शिंदे गटाकडून बीकेसी मैदानात मेळावा घेण्यात आला होता. 


शिवाजी पार्क मैदानावरुन पुन्हा दोन गट आमने-सामने येणार?


दरम्यान, शिवसेना शिंदे गटाकडून (Eknath Shinde) आमदार सदा सरवणकर यांच्याकडून शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांकडून पत्र देण्यात आलं आहे. ठाकरे गट तसेच शिंदे गट दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आग्रही आहे. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावे यासाठी एक महिना आधीच मुंबई महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पत्र दिल्याची माहिती 'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिली. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा एकदा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क दोन्ही गटांना मिळावं यासाठी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.


दुसरीकडे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क नेमकं कोणाला द्यायचं? यावर निर्णय घेणार असल्याची माहिती मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यास पुढील भूमिका दोन्ही गटाकडून घेतली जाणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या