Terror Attack Threat : राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई-मेलवरुन (Email) मुंबईवर हल्ला (Mumbai Attack) करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं (Taliban) नाव घेत धमकी दिली आहे. मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आले आहे. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ई-मेल आयडीवर हा मेल आला आहे. मेलमध्ये मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. ईमेल करणाऱ्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा मेल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. धमकीच्या मेलची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस आणि इतर तपास यंत्रणा याचा तपास करत आहे. मेल कोणी पाठवला? नेमका मेल कुठून आला आहे, याचा शोध तपास यंत्रणा करत आहेत. मुंबईसह देशातील इतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या सर्वात धोकादायक गट हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या सत्तेनंतर सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले. हक्कानी तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख नेता आहे. तालिबाननमध्ये हक्कानीचे नेटवर्क मजबूत आहे. अमेरिकेची एजन्सी एफबीआयने हक्कानीविषयी माहिती देणाऱ्याला 10 मिलिअन डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.
जानेवारी महिन्यात देखील मुंबईवर हल्ला करण्याची धमकी
जानेवारी महिन्यात देखील मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करत शहराच्या विविध भागात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. 1993 प्रमाणे मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. दोन महिन्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे फोनवर म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा हा मेल आला आहे.
सुरक्षा वाढवली
मुंबई कायमच दहशतवाद्यांचे लक्ष्य असतं. गेल्या सात वर्षात आपल्या सुरक्षा यंत्रणांनी मुंबईसारख्या शहरांचं दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण केलं आहे. मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. ताजमहाल पॅलेस हॉटेल, ताज लॅण्ड्स एंड हॉटेल, सिद्धिविनायक मंदिर, बाबुलनाथ मंदिर, मुंबादेवी मंदिर, हाजीअली दर्गा, मुंबई स्टॉक एक्स्चेंज, मंत्रालय, मुंबईसह उच्च न्यायालय आणि इतर महत्वाच्या आस्थापनांसह सुरक्षा वाढली आहे.