मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात आज शिवाजी पार्क जिमखाना येतील टेनिस कोर्टवर एक अनोखा रंगतदार सामना रंगला. सध्या या सामन्याची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड आहे. पण या सामन्यात कोण जिंकलं हे सध्या गुलदसत्यात आहे. मागील वर्ष-दीड वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या आरोग्यबाबत खूपच काळजी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणजे राज ठाकरे दररोज संध्याकाळी दोन तास शिवाजी पार्क येथील टेनिस कोर्टवर टेनिस खेळायला जात आहेत. यासाठी त्यांनी एक प्रशिक्षक देखील नेमला आहे. या प्रशिक्षकाच्या माध्यमातून राज ठाकरे ट्रेनिंग देखील घेत होते.


आज नेहमीप्रमाणे राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी शिवाजी पार्क येथील कोर्टवर आले. परंतु यावेळी त्यांच्यासोबत पुत्र अमित ठाकरे यांना पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आज जवळपास दोन तास रंगलेल्या या सामन्याने उपस्थितांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळालं. यातील विशेष बाब म्हणजे अमित ठाकरे हे प्रचंड फुटबॉल आणि टेनिस प्रेमी आहेत. मागील काही वर्षातील घडामोडी पाहिल्या तर त्यांचं फुटबॉल प्रेम सर्वांनाच माहिती आहे. जगभरात प्रसिद्ध असलेला रोनाल्डो हा फुटबॉलपटू देखील मागे अमित ठाकरे यांना भेटला होता. एकंदरीत आज अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात रंगलेल्या सामन्याने उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळवली.


मागील काही दिवसांपासून राज ठाकरे दररोज संध्याकाळी शिवाजी पार्क येथील जिमखान्यात टेनिस खेळायला जातात. त्यावेळी त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी त्यांनी आदित्य नावाच्या एका कोचची देखील नियुक्ती केल्याची माहिती आहे. दररोज संध्याकाळी शिवजी पार्क येथील जिमखाना येथे तास दोन तास टेनिस खेळणे, पहाटे साडेपाच वाजता लवकर उठून एक तास योगासने करणे. त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणे असे उपाय दररोज राज ठाकरे करत असल्याची माहिती आहे. यासोबतच वजन कमी करण्यासाठी त्यांनी संकेत कुलकर्णी नावाच्या एका प्रशिक्षकाची देखील नेमणूक केली असून संकेत हे राज ठाकरे यांना वजन कमी करण्यासाठीचा डायट कसा असावा याबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी आठवड्यातील काही वार देखील ठरवून घेतले आहेत.

मागील जवळपास एक वर्षांपासून राज ठाकरे यांनी टेनिस खेळणं सुरू केलं आहे. याचा चांगलाच फायदा राज ठाकरे यांना होतं असल्याची देखील माहिती आहे. यासोबतच राज ठाकरेंनी घरीच जीम तयार केली असून दररोज व्यायाम करून घेण्यासाठी एका ट्रेनरची देखील नेमणूक केली आहे. दररोज सकाळी योगासने करणे, जीममध्ये व्यायाम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे यासोबतच ज्या-ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी ते पोहण्याचा देखील आनंद घेत असतात. असे उपाय राज ठाकरे यांनी सुरू केले आहेत. एकंदरीत मागील दोन वर्षात आपल्या आरोग्याबाबत राज ठाकरे खूपच सजग झाले असून निरोगी आरोग्यासाठी विविध उपाय करत आहेत.