मुंबई : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar) या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता दादरच्या वसंत स्मृतीमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या पत्नी आणि शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत.
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर या पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच भाजपची सत्ता असलेल्या मुंबै बँकेवर त्यांची संचालक म्हणून वर्णी लागल्यानंतर त्या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती.
Mumbai Bank : मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. ते त्यावेळी मुंबै बँकेचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबै बँकेवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता असून त्यांच्याच नेतृत्वाखाली संचालकांनी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार अशी चर्चा सुरू झालीय
मुंबै बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती होण्यापूर्वी, तेसस्वी घोसाळकर यांनी 13 मे रोजी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहिसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या महिला शाखेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर एका महिन्याच्या आत तेजस्वी घोसाळकरांची मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती.
Tejasvee Ghosalkar News : भाजप प्रवेशाची चर्चा
मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर विनोद घोसाळकरांनी त्यावर स्पष्टीकरण देत तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगितलं होतं. विनोद घोसाळकरांनी त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.
तेजस्वी घोसाळकरांवर पक्षप्रवेशासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यावेळी विनोद घोसाळकरांनी केला होता. तसेच काहीही झालं तरी आपण ठाकरेंसोबतच राहणार, त्यांची साथ सोडणार नसल्याचं विनोद घोसाळकरांनी स्पष्ट केलं होतं. विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जातात. त्यामुळे विनोद घोसाळकर आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ही बातमी वाचा: