Mira Bhayandar : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी महायुतीबाबत स्पष्ट आणि निर्णायक भूमिका मांडली आहे. मीरा-भाईंदरमध्ये महायुतीचे सरकार पाहिजे. मात्र ही युती जर सन्मानपूर्वक होत असेल, तरच आम्ही त्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असे ठाम वक्तव्य सरनाईक यांनी केले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. सरकार पुढील महिन्यात निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत युतीतील प्रत्येक घटकाला योग्य सन्मान मिळणे आवश्यक असल्याचे सरनाईक यांनी अधोरेखित केले.

Continues below advertisement

भाजपला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत

भाजपला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा 50-50 चा फॉर्म्युला हा शिवसेनेचा ठाम आग्रह असल्याचे मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी पुन्हा स्पष्ट केले. मीरा-भाईंदरमधील सध्याची राजकीय परिस्थिती ही आठ वर्षांपूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत अनेक विकासकामे झाल्याचा दावाही त्यांनी केला. सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील जागावाटपावर चर्चा अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत युतीचे समीकरण कसे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला मोठे बळ; माजी आमदार गीता जैन यांच्या समर्थकांचा जाहीर प्रवेश

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेला आज मोठे बळ मिळाले आहे. माजी  आमदार गीता जैन यांच्या खंद्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेविका नयना वसानी, नारायण नंबियार, मिलन भट, प्रमोद दर्जी, संतोष शेट्टी, विजय इंजिनिअर आणि परवाना कुरेशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. हा पक्ष प्रवेश सोहळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले. या प्रवेश सोहळ्यात बोलताना प्रताप सरनाईक यांनी, “मिरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, स्थानिक पातळीवर जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे,” असे सांगितले. या पक्षप्रवेशामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येईल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत