मुंबई : देशात कांदे आणि टोमॅटोच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यात आता सर्वांच्या आवडत्या चहाचीदेखील भर पडणार आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रामधील तब्बल पाच हजार चहा विक्रेत्यांची चहा आणि कॉफी असोशिएशन नावाची एक संघटना आहे. या संघटनेने चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असोशिएशनने चहा विक्रेत्यांना किंमती वाढवण्यास सांगितले आहे.


चहा आणि कॉफी असोशिएशनने (Tea and Coffee Association -TCA) मुंबई महानगर क्षेत्रात चहाविक्री करणाऱ्या पाच हजार विक्रेत्यांना चहाची किंमत एक ते दोन रुपयांनी वाढण्यास सांगितले आहे. टीसीएने सांगितले की, दूध, साखर, चहापूड, एलपीजी सिलेंडरच्या किंमती खूप वाढल्या आहेत. त्यामुळे चहाची किंमत वाढवणे गरजेचे झाले आहे.


चार वर्षांपूर्वी टीसीएची निर्मती झाली आहे. टीसीएकडून चहाविक्रेत्यांना व्यवसायाबाबतचे आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. टीसीएने चहाविक्रेत्यांना नव्या किंमती लवकर सुरु करण्यास सांगितले आहे.


सध्याचे टपरीवरील चहाचे दर
कटींग चहा - 6 ते 8 रुपये
चहा (फुल) - 10 ते 12 रुपये
स्पेशल चहा (हाफ/कटिंग)- 10 ते 12 रुपये
स्पेशल चहा (फुल)- 15 ते 16 रुपये
कॉफी (हाफ) - 10 ते 12 रुपये
कॉफी (फुल) - 15 ते 18 रुपये


दरम्यान चहा आता केवळ चपरीवरच विकला जात नाही. कॉफीप्रमाणे चहाचेही अनेक मोठ-मोठे आऊटलेट्स सर्वत्र उपलब्ध आहे. येवले चहा, अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, रावजी चहा, अभिनंदन चहा, शेठजी चहा, चाय टाईम, Tea पी सारख्या आऊटलेट्समध्ये 10 रुपयांपेक्षा कमी किंमती चहा उपलब्ध नाही. या चहाच्या दुकानांमध्ये 10-15 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत चहा विकला जातो. त्यामुळे टपऱ्यांवरील चहाच्या किंमती वाढल्याने काहीही परिणाम होणार नाही, असा अंदाज चहा विक्रेते व्यक्त करत आहेत.