मुंबई : पश्चिम रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेच्या लोकलमधील महिला डब्यातही टॉक बॅक बटण लावण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डीके शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने यासंदर्भात घोषणा केली. सध्या पश्चिम रेल्वेत एका ट्रेनमधील सर्व महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.


मेट्रो ट्रेनच्या धर्तीवर उपनगरी लोकल ट्रेनमध्येही 'टॉकबॅक' प्रणाली बसवण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे महिला प्रवाशांना संकटकाळी गार्डशी थेट संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकेल. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून महालक्ष्मी कारशेडमध्ये ही प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे.

कशी असेल टॉकबॅक प्रणाली?

महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल.

या यंत्रणेद्वारे गार्डला महिलांच्या डब्यातील परिस्थितीची माहिती मिळताच पुढील कारवाईसाठी वेळ मिळेल. गार्ड संबंधित स्टेशन मास्तर, आरपीएफ किंवा रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देईल. त्यानंतर महिला प्रवाशांच्या मदतीसाठी तात्काळ पावलं उचलली जातील.

लोकल पुढील स्टेशनवर थांबवायची असल्यास तात्काळ याची सूचना मोटरमनला देणंही गार्डला शक्य होणार आहे. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करण्याच्या वृत्तीवर नियंत्रण येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.

पॅनिक बटणचा गैरवापर

मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षित प्रवासाठी रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर ‘पॅनिक बटण’ सुरु केलं. मात्र सुरुवातीच्या काळातच दोन वेळा त्याचा गैरवापर झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे त्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका रेल्वेने घेतली होती.

या बटणचा गैरवापर झाल्याने गेल्या वर्षी दोन दिवस लोकल सुमारे 15 मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मात्र या घटनांची चौकशी केली असता त्यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. अशावेळी एखादी लोकल 15 मिनिटे एकाच ठिकाणी कोणत्याही ठोस कारणाशिवाय उभी राहिल्यास संपूर्ण वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. ऐन गर्दीची वेळ असल्यास प्रवाशांचे प्रचंड हाल होतात.

संबंधित बातम्या :


महिला सुरक्षेसाठी रेल्वेची पावलं, टॉकबॅकने थेट गार्डशी संपर्क


संकटकाळी लोकलच्या महिला डब्यातून थेट गार्डशी संपर्क


महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पॅनिक बटण