मुंबई : जागतिक महिला दिनानिमित्त आज मुंबई उच्च न्यायालयात एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आल होतं. या सोहळ्यात यंदाच्य रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी खेळाडू ललिता बाबर हिचा सत्कार करण्यात आला.
हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या हस्ते ललिताला गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला हायकोर्टच्या सर्व महिला न्यायमूर्तींची खास उपस्थिती होती. ज्यात न्यायमूर्ती सौंदूबोलडाटा, न्यायमूर्ती मृदुला भाटकर, न्यायमूर्ती साधना जाधव, न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई, न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांचा समावेश होता. अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांच्या पुढाकारानं अश्याप्रकारे महिला दिन साजरा करण्याचं हे दुसरं वर्ष आहे.
हायकोर्टात पाळणाघर
या कार्यक्रमाचं औचित्य साधून मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. लवकरच हायकोर्टातील महिला कर्मचारी आणि महिला वकिलांच्या सोयीकरता पाळणाघर सुरू करत असल्याची माहीती त्यांनी दिली. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामावर असताना घरातील लहान मुलांची चिंता ही सर्व मातांना सतावत असते. हायकोर्टातील महिलावर्गही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या महिलावर्गाची या पाळणाघरामुळे मोठी सोय होणार आहे.
हायकोर्टाजवळील सीटीओ इमारतीत याकरता 900 चौ. फुटांची जागा याकरता आरक्षित केल्याची माहीतीही मुख्य न्यायमूर्तींनी जाहीर केली.
या कार्यक्रमात सदैव तटस्थ आपल्या कर्तव्याला प्राणपणानं जपणाऱ्य़ा न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच झलक पाहायला मिळाली. न्यायमूर्ती मृदूला भाटकर या स्वतः एक उत्तम कवयित्री आहेत, हे सर्वश्रुत आहे. मात्र, न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई, न्यायमूर्ती सौंदूबोलडाटा यादेखील उत्तम कविता करू शकतात याचा प्रत्यय यानिमित्तानं आला.