मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दोन लोकलमधील महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘टॉकबॅक’ बसवण्यात आलं आहे. आता ही टॉकबॅक प्रणाली सर्व लोकलमधील महिला डब्यात बसवली जाणार आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी गार्डशी तातडीने संपर्क साधण्यास मोठी मदत टॉकबॅक करणार आहे.


चेन स्नॅचिंगसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी किंवा इतरही गुन्ह्यांना रोखण्यासाठी, तसेच स्थानकासह लोकलच्या डब्यात लक्ष राहावं, यासाठी सर्व स्थानकं आणि लोकल डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचाही निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

सीसीटीव्ही आणि टॉकबॅक येत्या 15 महिन्यात बसवण्यात येणार आहे. सध्या 16 लोकलमधील 50 महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

या सर्व कामांसाठी सुमारे 104 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

टॉकबॅक प्रणाली कशी काम करेल?

गाडीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, महिला प्रवाशांना थेट गार्डशी संपर्क साधता येईल. त्यासाठी महिला डब्याच्या दरवाजाजवळ एक बटण बसवण्यात येईल. शिवाय डब्यात एक लहान स्पीकरही असेल. हे बटण दाबल्यावर महिला थेट गार्डशी संवाद साधतील.

नेमकं कोणत्या डब्यातील बटण दाबले गेले आहे, हे गार्डला कळण्याची सुविधा या यंत्रणेत आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत करण्यास सोयीचं होईल.