ठाणे : मला रस्ते मार्गाने उत्तर प्रदेशला न नेता, हवाई मार्गाने घेऊन जावे, अशी मागणी चकमकीत ठार झालेल्या गँगस्टर विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी याने आज ठाणे कोर्टात केली. विकास दुबेला ज्याप्रकारे मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशला घेऊन जाताना रस्त्यात चकमकीत ठार मारण्यात आले, त्या प्रकारे मला देखील मारतील, अशी भीती गुड्डन त्रिवेदी याने वकिलांमार्फत कोर्टात सांगितली. दरम्यान गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा साथीदार सोनू तिवारी या दोघांना न्यायालयाने 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


गॅंगस्टर विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा गुंड अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि त्याचा साथीदार सोनू तिवारी यांना काल मुंबई एटीएसमधील दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून अटक केली. या दोघांना आज ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना न्यायालयाने 21 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांवरील गुन्हे उत्तर प्रदेशला असल्याने महाराष्ट्रात त्यांची चौकशी करण्याची गरज नाही. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी त्रिवेदीच्या वकिलांनी केली होती.


विकास दुबेचा निकटवर्तीय गुड्डन त्रिवेदी कसा पकडला गेला?


उत्तर प्रदेश पोलिसांची टीम या दोघांना घेण्यासाठी रवाना झालेली असल्याने, जोपर्यंत ती टीम येत नाही तोपर्यंत या दोघांना 21 जुलैपर्यंत तळोजा कारागृहात ठेवले जाईल. कारागृहात नेण्याच्या आधी त्यांची covid-19 ची चाचणी देखील करण्यात येईल. दरम्यान विमानाने प्रवासाबाबतची मागणी न्यायालयाने ऐकून घेतली असली तरी त्यावर निर्णय दिलेला नाही.


उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील गॅंगस्टर विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने उज्जैन येथे पकडले. मात्र उज्जैन येथून कानपूरला घेऊन जात असताना रस्त्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो मारला गेला. याचा धसका कदाचित त्याचा साथीदार गुड्डन त्रिवेदी आणि त्याच्या नातेवाईकांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबई इथून कानपूरला घेऊन जाताना, विमान मार्गाने घेऊन जावे अशी मागणी त्याने केली आहे.


Vikas Dubey Encounter : विकास दुबेचा एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा


विकास दुबेने पोलिसांची हत्या केल्यानंतर त्यासोबत गुड्डन त्रिवेदी देखील होता. हे दोघे एकत्र पळून जाण्यात यशस्वी झाले होते. उज्जैनपर्यंत ते दोघे एकत्र होते. मात्र त्यानंतर विकास दुबे तिथेच थांबला आणि गुड्डन त्रिवेदी त्याच्या साथीदारांसह ठाण्यातील कोलशेत इथे पोहोचला. भाजीच्या गाडीमध्ये बसून त्याने ठाण्याचा प्रवास केला. उज्जैन ते राजस्थान, राजस्थान ते पुणे, पुणे ते नाशिक आणि नाशिक ते ठाणे असा उलट सुलट मिळेल त्या वाहनाने प्रवास करत तो साथीदारासह ठाण्यात आला होता. मात्र मुंबईच्या एटीएस पथकातील दया नायक यांच्या टीमने त्यांना शोधून काल अटक केली.