मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नू विविध विषयांवर आपली भूमिका ठामपणे नेहमीच मांडत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपलं मत मांडत असते. तापसी सोशल मीडियावरील एक ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिने लॉकडाऊनदरम्यान तिला आलेल्या वीज बिलांवरून नाराजी व्यक्त केली आहे. तापसीने ट्वीट करुन तिला आलेले विजेचं बिल शेअर केलं आहे.
सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ वीज बिल आल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं अलिशान राहणीमान आपल्यासमोर येतं. मात्र सेलिब्रिटींनाही वीज बिलाचा शॉक बसू शकतो, हे तापसीच्या ट्वीटमधून समोर आले आहे. तापसीने ट्वीट करुन म्हटलं की, "लॉकडाऊनला आता तीन महिने झाले आहेत. मी आता हाच विचार करत आहे की गेल्या महिन्यात मी असं कोणतं विद्युत उपकरण घरात लावलं की माझं वीज बिल एवढं वाढलं." ट्वीट करताना तापसीने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबईला टॅग करत विचारलं की, "असं तुम्ही किती चार्ज करता?"
त्यानंतर तापसीने आणखी एक ट्वीट केलं. त्यात तापसीने लिहिलं की, "हे वीज बिल त्या घरासाठी आहे, जिथे कुणीही राहत नाही. आठवड्यातून फक्त एकदा कुणीतरी तिथे जातं, ते ही साफसफाईसाठी. आता मला ही चिंता आहे की, मला न सांगता तिथे कुणी माझ्या घरात राहत तर ना आणि याची माहिती देण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत तर करत नाही ना." तापसीचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.