नेरे गावातील वामन पाटील यांनी मुलाचा लग्न समारंभ आयोजित केला होता. नवरदेव जितेश पाटील याने लग्नाच्या आदल्या दिवशी हळदीचा मोठा बेत ठेवला होता. हळदीला थोडे थोडके नाही तर चक्क 400 ते 500 जणांनी हजेरी लावली होती. सर्वांसाठी खेकडे, मासे, मटनाची मेजवानी होती. राज्य सरकार एकीकडे गर्दी जमवू नका असे सांगत असताना दुसरीकडे सर्व नियम पायदळी तुडवून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार केला गेला. दुसऱ्या दिवशी लग्न समारंभातही मोठी गर्दी जमविण्यात आली होती. 50 लोकांना परवानगी असतानाही जास्त लोक आले होते. विशेष म्हणजे एवढे सर्व होत असताना ना स्थानिक पोलीसांचे लक्ष होते ना तहसीलदारांचे.
अखेर कोरोना संसर्ग झाल्यामुळे गर्दीचे बिंग फुटले. नवरदेवाचा भाऊ जितेंद्र याला कोरोनाने गाठले. कोरोनामुळं त्याचा मृत्यू झाला. तर गावातील इतर 12 जण कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. सध्या संपूर्ण गाव लाॅकडाऊन करण्यात आले आहे. हळदी समारंभ आणि लग्न समारंभाला गर्दी केल्या प्रकरणी नवरदेव , वडील आणि मुलीचे वडील असे तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबईत सात दिवसांचा लाॅकडाऊन
कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होणाऱ्या दहा ठिकाणी लाॅकडाऊन करण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या परिसरातील 70,712 घरांमध्ये विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत.
नवी मुंबई मधील कोरोनाचा आकडा 6003 झाला असून आतापर्यंत 201 जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा क्षेत्रातील परिस्थितीचा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. सद्यस्थितीमध्ये शहरात 34 कंटेन्मेंट झोन आहेत. हे झोन रूग्ण सापडलेल्या घर किंवा इमारतीमधील मजल्यांपुरते मर्यादित आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दहा विशेष कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये दिवाळे गाव, करावे गाव, तुर्भे स्टोअर, तुर्भे सेक्टर 21, 22, जुहूगाव सेक्टर 11, बोनकोडे गाव, कोपरखैरणे गाव सेक्टर 19, रबाळे गाव व चिंचपाडा परिसराचा समावेश आहे.
29 जून ते 5 जुलै दरम्यान या परिसरात विशेष लाॅकडाऊन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. महानगरपालिका या दहा ठिकाणच्या 70712 घरांमध्ये जावून सर्वेक्षण करणार आहे. कोणीही संशयित रूग्ण सापडल्यास त्याची स्वॅब टेस्ट केली जाणार आहे.