मुंबई : सध्या मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे, पण दुसरीकडे रोगराईनं डोकं वर काढलं आहे. सध्या मुंबईकरांना स्वाईन फ्ल्यूने विळखा घातला असून, यामुळे एका गर्भवतीसह 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गॅस्ट्रोचे रुग्णही आढळून आले आहेत.

वातावरणातील बदलानं आणि तापमानातील चढ-उतारानं मुंबईत सध्या स्वाइन फ्ल्यूनं थैमान घातलं आहे. सध्या शहरातील 285 रुग्णांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून आतापर्यंत 10 जणांचा बळी गेला आहे. त्यात सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचाही समावेश आहे.

स्वाईन फ्ल्यूपाठोपाठ गॅस्ट्रोची साथ बळावल्याचंही कळतं आहे. महापालिकेच्या रुग्णालयात गॅस्ट्रोचे आतापर्यंत 201 रुग्ण आढळलेत.

त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि बाहेरचं खाताना-पिताना विचार करुनच ते घ्यायचे की नाही हे ठरवावं, असं आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.