मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी अखेर सरकारी बंगला सोडला आहे. मुंबईत दोन मालकीची घरं असूनही, निवृत्तीनंतरही क्षत्रिय हे A-10 या सरकारी बंगल्यातच राहत होते. एबीपी माझाच्या बातमीनंतर अखेर क्षत्रिय सरकारी बंगल्यातून बाहेर पडले आहेत.

मुंबई-ठाण्यात मालकी हक्काची घरं असूनही राज्याच्या आजी-माजी अधिकाऱ्यांना सरकारी निवासस्थानाचा मोह टाळता येत नाही. असाच एक प्रकार राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याबाबत समोर आला होता.

वांद्रे आणि नेरुळमध्ये मालकीची घरं असूनही स्वाधीन क्षत्रिय यांनी शासकीय निवासस्थान सोडलं नव्हतं. शिवाय, त्यांनी त्याबदल्यात आणखी एका नवीन निवासस्थानाचा हट्ट धरला होता.

राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होऊनही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरचा आलिशान शासकीय बंगल्याचा ताबा सोडला नव्हता. याउलट सेवा अधिकाराच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर ते ‘सारंग’ या शासकीय इमारतीत दोन नवीन फ्लॅटची मागणी करत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली होती.

स्वाधीन क्षत्रिय यांच्या वार्षिक विवरण पत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीची दोन घरं मुंबई आणि नेरुळमध्ये आहेत. या घरांच्या भाड्यातून त्यांना 20 लाखांची वार्षिक मिळकत होते. असे असतानाही स्वाधीन क्षत्रिय यांनी सराकारी बंगला सोडला नव्हता. अखेर एबीपी माझाच्या बातमीनंतर त्यांनी बंगला सोडला आहे.