ठाणे : मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत 17 चोरांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांनी चोरलेला 25.6 लाखांचा मुद्देमाल देखील आरपीएफने हस्तगत केला आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफ इंटेलिजन्स विंग आणि कुर्ला आरपीएफने एकत्र मिळून ही कारवाई केली आहे. यामुळे रेल्वे सामग्रीची मोठी चोरी रोखण्यात आरपीएफला यश आले आहे.


ही कारवाई 18 ऑगस्टला करण्यात आली. इंटेलिजन्स विंगच्या माहितीच्या आधारे कुर्ला आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी कुर्ला विभागात एका ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात त्यांनी 34 मेट्रिक टन वजनाचे साहित्य पकडले. याच चोरांकडून एक ट्रक, एक स्कुटी, पंधरा ऑक्सीजन सिलेंडर, पाच व्यवसायिक गॅस सिलेंडर आणि नऊ गॅस कटर जप्त करण्यात आले आहेत. या चोरांनी चोरलेल्या रेल्वेच्या साहित्याची किंमत 25.6 लाख इतकी आहे.




मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनजवळ ओव्हर हेड वायर उभारण्याचे काम करण्यात येणार होते. त्यासाठी कुर्ला येथील डिझेल शेड जवळ, या कामासाठी लागणारे महागडे साहित्य ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी याच साहित्यावर डल्ला मारला. एका ट्रकमध्ये भरून हे साहित्य चोरण्यात आले होते. त्यामुळे आरपीएफ या ट्रकच्या मागावर होती. अखेर 12 तासाच्या आत हा ट्रक शोधून त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याच वेळी 17 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये या चोरीचा मुख्य सूत्रधार देखील होता.


कुर्ला येथील आरपीएफ इन्स्पेक्टर पी. आर. मीना, दादर येथील इन्स्पेक्टर एस. के. कोस्टा, आणि क्राईम इंटेलिजन्स ब्रान्च मधील इन्स्पेक्टर अमित राघव या सर्वांनी मिळून असिस्टंट सिक्युरिटी कमिश्नर संजीव राणा यांच्या नेतृत्वात ही कारवाई केली.


महत्त्वाच्या बातम्या :