पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबतचे सेल्फी ट्विटरवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सुप्रिया सुळेंनी टॅग केले आहे.

कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळेंनी लिहिले आहे, "#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat. @ChDadaPatil"

https://twitter.com/supriya_sule/status/925595113765552133

अगदी काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी नवी डेडलाईन जाहीर केली आहे. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या डेडलाईनच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळेंच्या या 'सेल्फी विथ खड्डे'ला महत्त्वं प्राप्त झालं आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या या ट्वीटखाली आता राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणचे लोक खड्ड्यांसोबतचे फोटो शेअर करत असून, व्यथाही मांडत आहेत.

आता खड्ड्यांविरोधातील हा ऑनलाईन आवाज तरी चंद्रकांत पाटलांपर्यंत पोहेचेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.