मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दिवसेंदिवस महिला अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांची भूमिका ही अतिशय निष्काळजीपणाची असल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबईतील घाटकोपरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे.
घाटकोपरमध्ये विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून अमानुषपणे छळ करण्यात आला. आंबेडकर नगर भागात राहत असलेल्या पंचशिला मिलिंद सावंत या महिलेला हुंड्यासाठी सारच्यांनी अतोनात छळलं. या महिलेच्या हातावर, पायावर, पोटावर आणि गुप्तांगावर चटके देण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक रिंगण आखून त्यात या महिलेला दिवसभर उभं राहण्याची शिक्षा देत सासरच्यांनी जबर मारहाण केली.
मूळची लातूर जिल्ह्यातील असलेली पंचशीलाच्या वडिलांना अर्धांगवायू झाला आहे. तिची माहेरची परिस्थिती अतिशय बेताची आहे. मात्र सासरचे तिच्याकडे वारंवार 20 लाख रुपयांची मागणी करत होते आणि तिचा छळ करीत होते, असा आरोप तिने केला आहे.
पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी आठ तास बसवून ठेवलं
या प्रकरणाची तक्रार करण्यास घाटकोपर पोलीस ठाण्यात गेलेल्या या महिलेला दुपारी तीन वाजल्यापासून बसवून ठेवण्यात आलं. त्यानंतर तिला दोन दिवसांनी या असं उत्तर देण्यात आलं. अखेर हे प्रकरण प्रसारमाध्यमांसमोर गेल्याचं कळताच रात्री 11 वाजता या महिलेचा जबाब नोंदवून सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
अखेर आठ तासानंतर महिलेच्या पतीसह पाच जणांवर कलम 498 अ अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी या पीडित महिलेचा पती मिलिंद सावंत याला ताब्यात घेतलं. या मारहाण आणि शिक्षेमुळे जखमी झालेल्या पंचशिला यांच्यावर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पंचशीला यांना तक्रार देण्यासाठी आठ तास बसवून ठेवणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का, हा प्रश्न आहे.