मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला आहे.


एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांचा अपमान करण्याची एकही संधी काँग्रेस सोडत नसल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

मालाडमध्ये फेरीवाला सन्मान मोर्चा काढल्यानंतर आज संजय निरुपम दादरमध्ये फेरीवाल्यांच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत.

सकाळी 11 वाजता होणाऱ्या या आंदोलनात मुंबईभरातील सगळ्या फेरीवाल्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन निरुपम यांनी केलं आहे.

दरम्यान, दादर पश्चिमेकडील नक्षत्र मॉल इथून मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चा तिथून सुरु होईल. आधी स्टार मॉलकडून मोर्चा निघणार होता, पण पोलिसांनी नक्षत्र मॉल कडून परवानगी दिल्याने मोर्चा तिथून निघणार आहे.

दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं.

दरम्यान काँग्रेसचा मोर्चा शिवसेना आणि मनसेचा गढ असलेल्या दादरमध्ये होत असल्यानं पोलिसांनी तुफान बंदोबस्त तैनात केला आहे.

तसंच पोलिसांनी मनसेच्या काही नेत्यांची धरपकडही सुरु केली आहे. तर व्यापाऱ्यांनी अनुचित घटनेच्या भीतीनं आपली दुकानं बंद ठेवली आहेत.

http://polldaddy.com/poll/9864850/

मनसेचं आंदोलन

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती. त्यासाठी त्यांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत.

मनसे विभाग अध्यक्षाला मारहाण

दरम्यान मनसेने मालाडमध्येही फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केलं. मात्र या आंदोलनादरम्यान  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केला. यात माळवदे यांना जबर जखम झाली.

मनसे नेते संदीप देशपांडेंना अटक आणि सुटका

मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री उशिरा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

संजय निरुपम यांनी चिथावल्याचा आरोप

दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे फेरीवाल्यांनी मनसे पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. संजय निरुपम यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची मागणीही मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केली.

राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट

फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले सुशांत माळवदे यांना कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी रविवारी ऑस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन माळवदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली.

संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनापरवागी सभा घेऊन लोकांना कायदा हातात घेण्याचं आवाहन करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी निरुपम यांच्या भडकाऊ भाषणाचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं आहे. शनिवारी संध्याकाळी मालाडमध्ये फेरीवाल्यांनी मनसे विभाग अध्यक्षांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळतं आहे.

सात फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

मुंबईतल्या मालाड भागात मनसे कार्यकर्त्याला झालेल्या मारहाण प्रकरणी 7 फेरीवाल्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. काल मालाडमध्ये मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना काही फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली.

संबंधित बातम्या

काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार!

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी घेतली मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदेंच्या भेट 

… तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात


दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला 

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा