मुंबई : कोणत्याही संकटात मुंबई पोलीस नेहमीच तत्पर असतात. मग तो दहशतवादी हल्ला असो, आंदोलन असो की पाऊस. मुंबई पोलीस नेहमीचं नागरिकांच्या रक्षणाकरता आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. याच मुंबई पोलिसांवरुन काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करण्यता आले. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.


मुंबईत कालपासून पावसामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्याची काल वाय.बी. चव्हाण इथे बैठक होती. बैठक झाल्यावर घरी परतताना स्वतः शरद पवार यांनी देखील आयुष्यात पहिल्यांदा असं चित्र पाहिल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांचं कौतुक केलं.

"आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच… तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट.." असं ट्विट सुळे यांनी केलंय.

अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला
सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे विशेष कौतुक केले. पण अवघ्या दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र मुंबई पोलिसांवर आक्षेप घेतला होता. फिल्म्स स्टार सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी या शहरात मला सुरक्षित वाटत नाही, या शहरात माणुसकी राहिलेली नाही, अशी भावना व्यक्त केली होती.आणि आज सुप्रिया सुळे यांनी ट्विट मधून अप्रत्यक्षरीत्या अमृता फडणवीस यांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

राज्यात सध्या सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. भाजप एकीकडे सीबीआय तपासाची मागणी करत असताना महाविकास आघाडी मात्र मुंबई पोलिसांच्या मागे ठाम उभी आहे. अशा वेळी ट्विटरवरुन भाजप विरुद्ध शिवसेना सामना रंगला असताना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पोलिसांचे कौतुक करून शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं चित्र आहे.

Mumbai Tree Collapsed | मुसळधार पावसामुळे मुंबई हायकोर्ट परिसरातील झाडं उन्मळून पडली