मुंबई : माझे वडील लहान मुलासारखे आहेत. निवडणूक म्हणजे त्यांच्यासाठी ऊर्जा आहे. लहान मुलाला जसं खेळण्याच्या दुकानात गेल्यावर उत्साह असतो तसे माझे वडील निवडणुकीत उत्साही असतात. आम्हाला त्यांना सांगावं लागत प्रचार थांबला आता बस करा, असे सुप्रिया सुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला.


आपल्या पित्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साताऱ्यात जेव्हा वडिलांना पाहिलं तेव्हा एक महायोद्धा कसा असतो तसा ते चित्र होतं. त्यावेळी अंगावर काटा आला होता. त्यावेळी माझ्या वडिलांचा मला अभिमान वाटला. एक आदर्श महायोद्धा कसा असावा तो त्या दिवशी मला दिसला. एक मुलगी म्हणूनच नाही तर कार्यकर्ता म्हणून देखील प्रेरणादायी आहे.

मला एक्झिट पोलच्या आकड्यांवर विश्वास नाही, आम्हाला चांगल्या जागा मिळतील.  प्रत्येक पक्षाची स्ट्रॅटेजी असते, तसा ते प्रचार करतात.  आम्ही गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा मिळवू, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी सुफडा साफ होईल, अशी भाषा वापरली जात आहे. आम्ही अशी भाषा बोलत नाहीत, राजकारणात अशी भाषा कोणीही वापरू नये, नुसती सत्ता येऊन उपयोग नाही दानत असावी लागते, असेही त्या म्हणाल्या.

पोल वगैरे अनेक आले असतील मात्र लोकांमधील मूड यावेळी वेगळाच आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन ते अनुभवलं आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या प्रचाराबाबत त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, प्रत्येक पक्षाने कसा प्रचार करायचा हे त्यांनी ठरवलेलं असतं. काँग्रेसने देखील चांगला प्रचार केला आहे, असे सुळे म्हणाल्या.