BJP MLA Suspension :  राज्यातील ठाकरे सरकार अहंकारात असून त्यांनी अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राज्य सरकारने भाजप आमदारांविरोधात केलेल्या निलंबनाच्या ठरावावर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले असून हा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचे शेलार यांनी म्हटले. 


सुप्रीम कोर्टाने भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर पत्रकार परिषदेत आशिष शेलार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य विधानसभेत सरकारने केलेला ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन असल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टाने ओढले. अशा प्रकारचे ताशेरे पहिल्यांदाच राज्य सरकारवर ओढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेलं निलंबन हे त्यांच्या हकालपट्टीपेक्षाही भयंकर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते असे शेलार यांनी सांगितले. 


सुप्रीम कोर्टाचा निकाल ऐतिहासिक असल्याचे शेलार यांनी म्हटले. सरकारला आपली चूक सुधरवण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिली होती. मात्र, ठाकरे सरकारने अहंकारात शहाणपण गमावलं असल्याची टीका शेलार यांनी केली. ठाकरे सरकारच्या अवैध ठरावामुळे विधीमंडळाच्या पारदर्शी कामकाजाला ठाकरे सरकारच्या ठरावामुळे इजा पोहचली आहे. महाराष्ट्राबद्दल देशात होणारी अवास्तव चर्चा सरकारला थांबवता आली असती. ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च पातळीवर असल्याचे शेलार यांनी म्हटले. 


काय घडलं होतं विधानसभेत?


मागील वर्षी जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाबाबत ठराव मांडण्यात आला होता. केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत हा ठराव होता. या ठरावाला भाजप आमदारांनी जोरदार विरोध केला. यावेळी भाजपच्या काही आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. विधान सभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यांशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं होतं.


निलंबित केलेले आमदार 


आशिष शेलार (वांद्रे पश्चिम)


अभिमन्यू पवार (औसा)


गिरीश महाजन (जामनेर)


पराग अळवणी (विलेपार्ले)


अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व)


संजय कुटे (जामोद, जळगाव)


योगेश सागर (चारकोप)


हरीश पिंपळे (मूर्तीजापूर)


जयकुमार रावल (सिंधखेड)


राम सातपुते (माळशिरस)


नारायण कुचे (बदनपूर, जालना)


बंटी भांगडिया (चिमूर)