मुंबई : कोरोनाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ऑक्सिजनची टंचाई संपूर्ण देशात निर्माण झाली आहे. आपल्याला परदेशातूनही ऑक्सिजन आयात करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ऑक्सिजनची  गरज, उपलब्धता आणि त्याचे वितरण या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यासाठी देशातील 12 डॉक्टरांचा नॅशनल टास्क फोर्स तयार केला आहे.  सुप्रीम कोर्टाच्या या टास्क फोर्समध्ये महाराष्ट्रातील मुंबईमधून दोन डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. हिंदुजा रुग्णालयातील डॉ. झरीर उडवाडिया आणि फोर्टिस रुग्णालयातील डॉ. राहुल पंडित यांचा समावेश असून हे दोन्ही डॉक्टर सध्या राज्याच्या कोविड टास्क फोर्समध्ये कोरोनाच्या उपचारा संदर्भातील मार्गदर्शक सूचना देत असतात. 


देशातील ऑक्सिजनच्या टंचाईबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. कोरोनाच्या या वैश्विक महामारीत सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे तो ऑक्सिजनचा. देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. काही ठिकाणी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन मिळविण्यासाठी आणि त्याच्या निर्मितीसाठी देशात प्रयत्न केले जात आहे. मिळेल त्या मार्गाने आणि पद्धतीने ऑक्सिजन मिळविण्यासाठी जंग जंग पछाडलं जात आहे. देशात आरोग्य आणीबाणीची वेळ असताना ऑक्सिजन आणण्यासाठी हवाई वाहतूक, जल वाहतूक, रेल वाहतूक आणि रस्ते वाहतूक या  मार्गाने ऑक्सिजन देशात आणून विविध राज्याला पुरवला जात आहे. 


डॉ झरीर उडवाडिया सध्या हिंदुजा आणि ब्रीच कॅण्डी रुग्णालयात श्वसन विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ड्रग्स रेजिस्टन्सच्या क्षय रोगात त्यांनी मोठे संशोधन आणि काम उभारले असून त्याच्या या कामाची दखल राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आली आहे. जागतिक आरोग्य परिषदने 2010 साली क्षयरोगासंदर्भातील मार्गदर्शक सूचना बनविण्याकरिता निमंत्रित केलेल्या जगभरातील डॉक्टरांमध्ये डॉ उडवाडिया हे भारतातील एकमेव डॉक्टर होते.  डॉ उडवाडिया हे ग्रांट मेडिकल कॉलेज (सर जे जे रुग्णालय ) येथील विद्यार्थी असून त्यांनी काही काळ लंडन येथील विविध रुग्णालयात काम करून क्षयरोग आणि श्वसन विकार या विषयात विशेष प्राविण्य मिळविले आहे. वर्षभरात त्यांच्याओ पी डी मधून 8000 पेक्षा अधिक रुग्णांची ते तपासणी करतात. त्यांच्याच देखरेखीखाली हिंदुजा रुग्णालयात श्वसन विकाराचा विभाग १९९२ मध्ये सुरु करण्यात आला. डॉ. उडवाडिया यांनी 1994 मध्ये शहरातील स्लीप लॅबोरेटोरीची स्थापना केली.  आतापर्यंत त्यांचे 140 पेक्षा जास्त शोध निबंध विविध आंतरराष्ट्रीय जर्नल मधून प्रसिद्ध झाले आहेत. 


सर्वोच्च न्यायालयाच्या ऑक्सिजन टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आलेले मुंबईचे दुसरे मोठे डॉक्टर डॉ राहुल पंडित. मुलूंडच्या फोर्टिस रुग्णालयात क्रिटिकल केयर मेडिसिन विभागाचे संचालक म्हणून काम पाहतात. अति दक्षता विभागातील रुग्णांवरील उपचारात त्यांनी विशेष कौशल्य प्राप्त केलेलं आहे. कोरोनाच्या सुरवातीपासून ते कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करीत असून, या आजारावरील  उपचार पद्धती विकसित करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. अतिदक्षता विभागातील कामकाजाविषयी त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे जाऊन विशेष शिक्षण घेतले आहे.  अति दक्षता विभाग कसे असावेत याबाबत त्यांनी बनवलेल्या गाईडलाईन्स आजही आदर्श मानल्या जातात.          


या दोन डॉक्टरांसोबत देशभरातील डॉ भाबतोष बिस्वास, डॉ देवेन्द्रसिंग राणा, डॉ देवी प्रसाद शेट्टी, डॉ गंगदीप कांग, डॉ जे व्ही पीटर, डॉ नरेश त्रेहान, डॉ सौमित्र रावत, डॉ शिवकुमार सरीन या वरिष्ठ डॉक्टरांचा या नॅशनल टास्क फोर्स मध्ये समावेश आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील युद्धात सैन्यदलानी सहभाग घ्यावा म्हणून सूचना केली होती. त्यानुसार नौदलाने या मोहिमेत युद्धनौका पाठविण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये मुंबईत मुख्यालय असलेल्या पश्चिम नौदल कमांड येथील  पाच युद्धनौका आणि अन्य नौदल तळावरील दोन अशा साथ युद्धनौका बाहेरच्या देशातून ऑक्सिजन आणण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.   त्याशिवाय भारताला लागणाऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केला आहे. युनिसेफच्या माध्यमातून हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरविण्यात येणार आहे.


त्याशिवाय कोरोनाच्या उपचारात लागणारी काही उपकरणे देण्यात येणार आहे. या मोठ्या अडचणीच्या काळात विविध जगातील विविध देशातून भारताला मदत पुरविण्याचे काम सुरु आहे. या सगळ्या मदतीत विशेष करून ऑक्सिजन कसा मोठ्या पद्धतीने प्राप्त होईल यावर भर देण्यात आला आहे.  महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात प्राणवायूची टंचाई असल्यामुळे रेल्वेची  मदत घेऊन इतर राज्यातून लिक्विड ऑक्सिजनचे टॅंक आणण्यात आले आहेत , त्या गाडीला ऑक्सिजन एक्सप्रेस नावाने ओळखले जात असून देशातील अनेक भागात या ऑक्सिजन एक्सप्रेस तर्फे ऑक्सिजन पुरविण्याचे काम सुरु आहे.