नवी दिल्ली : ज्या तीन डान्स बारनी राज्य सरकारच्या कडक नियमांवर आक्षेप घेतला होता, त्यांना सुप्रीम कोर्टाने तूर्तास दिलासा दिला आहे. आधीच्या नियमांनुसार बार सुरु ठेवण्याची मुभा तिन्ही डान्स बारना देण्यात आली आहे.
पद्मा पॅलेस, उमा पॅलेस आणि इंडियाना रेस्टॉरंट यांना सुप्रीम कोर्टाने आधीच्या नियमांनुसार बार सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. नियम आखणं राज्याच्या अखत्यारित येतं, असा दावा राज्य सरकारने केला होता.
डान्स बारमध्ये दारुविक्री करु नये, डान्स बारमध्ये सीसीटीव्ही लावले जावेत असे नियम राज्य सरकारनं लावले आहेत. मात्र त्याऐवजी सरकार संपूर्ण दारु विक्रीवरच बंदी का आणत नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला आहे.
दरम्यान, याबाबतची पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार आहे.