नवी मुंबई / सोलापूर : नवी मुंबई आणि सोलापुरात मराठा क्रांती मूकमोर्चाला सुरुवात झाली आहे.
नवी मुंबईत खारघर सेंट्रल पार्कमधून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला आहे.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द नव्हे तर त्यामध्ये बदल करा, मराठा समाजाला आरक्षण द्या या प्रमुख मागण्या मराठा मूक मोर्चाद्वारे करण्यात येत आहेत.
सोलापुरात गर्दीचा उच्चांक
सोलापूर - टेंभुर्णीपासून सोलापूरपर्यंत हायवेची एक लेन फक्त भगव्या वाहनासाठी राखीव. गर्दीचा उच्चांक. मंगळवेढा रस्त्यावर बेगमपूरपर्यंत वाहनांच्या रांगा. सोलापूर संपूर्ण बंद. मराठा मोर्चात सहभागी झालेल्या गर्दीची लांबी अंदाजे पंधरा ते सोळा किलो मीटर.
नवी मुंबई मराठा मोर्चा
नवी मुंबईतील मराठा मोर्चात मोठ्या प्रमाणात डॉक्टरांनी सहभाग नोंदवला आहे. हे डॉक्टर नवी मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करत असले, तरी त्यांची कुटुंबं सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, पुणे अशा जिल्ह्यांमधे शेती करतात. मराठा आरक्षण आणि शेतमालाला योग्य भाव, अशा मागण्या या डॉक्टरांनी केल्या आहेत.
राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चानं आता आपला मोर्चा नवी मुंबई आणि सोलापूरकडे वळवला आहे. आज नवी मुंबईतल्या खारघरमध्ये आणि सोलापुरात मराठा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
नवी मुंबईत निघणारा मोर्चा हा रायगड आणि नवी मुंबई असा दोन विभागांचा आहे. त्यामुळे यात लाखोंचा जमाव सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सेंट्रल पार्क ते कोकण भवन असा हा मोर्चा निघणार आहे .
तर दुसरीकडे सोलापुरातही मोर्चाला मोठी गर्दी होताना दिसत आहे.खेडोपाडीच्या गाड्या भरुन सोलापूरच्या दिशेनं निघाल्या आहेत. संभाजी चौक ते होम मैदानापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
इकडे मुंबईत दिवाळीच्या आधी भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी मंदिरात काल बैठकही घेण्यात आली.