मुंबई : मुसळधार पावसानंतर मुंबईकरांना आज सूर्यदर्शन झालं आहे. काल दिवसभर धो धो बरसल्यानंतर पावसाने मुंबईत आज जराशी उसंत घेतली. मात्र तरीही दिवसभरात पावसाने अनेकदा हजेरी लावली. पावसामुळे ठिकठिकाणी तुंबलेलं पाणी आज ओसरलं आहे, तर रेल्वे वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
रस्त्यांवर पाणी भरल्यामुळे मुंबईकरांना अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. अनेक जण काल दिवसभर आणि रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर वाहतूक कोंडीत अडकून होते. अनेकांनी वाहनं जागीच सोडून पर्यायी वाहतूक व्यवस्थेने घरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. तर पाण्यात वाहनं बंद पडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
रस्ते वाहतूक सुरळीत, लोकल हळूहळू पूर्वपदावर
धीम्या गतीने सुरु असलेली रस्ते वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांचे सकाळपासून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बंद पडण्यासाठी वाहनं बाजूला काढण्यासाठी टोईंगचा वापर केला जात आहे. तर तुमचं वाहनही बंद पडलं असेल, तर पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
पावसामुळे मध्य रेल्वेवर खोळंबलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. थोड्याच वेळापूर्वी हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. तर मध्य रेल्वेवरची वाहतूक सुरु आहे. मात्र काही लोकल अजूनही उशिराने धावत आहेत. पावसामुळे अनेक लोकल आणि एक्स्प्रेसना रुळावरच थांबवण्यात आलं होतं. त्याच रेल्वेगाडया आज आधी हटवण्यात आल्या.
मध्य रेल्वे
पावसामुळे मध्य रेल्वेवर खोळंबलेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीवरुन सकाळी 7.26 ला कल्याणकडे जाण्यासाठी पहिली लोकल सुटली. त्यानंतर मागोमाग दुसरी लोकलही निघाली, मात्र पुढे सायनजवळ ट्रॅकवर पाणी असल्याने, वाहतूक रखडली.
मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक काही वेळातच रखडली होती. मात्र दुपारी 1.20 ला मध्य रेल्वेची अप आणि डाऊन फास्ट वाहतूक सुरु झाली. तसंच डाऊन स्लो वाहतूकही सुरु झाली.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावर सकाळी 9.03 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र ही वाहतूकही जास्तवेळ सुरु राहिली नाही. काही क्षणांतच वाहतूक रखडून ती ठप्प झाली. मात्र दुपारनंतर हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल दरम्यान लोकल धावली. आता हार्बर मार्गावरची वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र लोकल उशीराने धावत आहेत.
पश्चिम रेल्वे नेटाने सुरु
मध्य आणि हार्बर रेल्वेने नांगी टाकली असली, तरी पश्चिम रेल्वे मात्र नेटाने सुरु आहे. सकाळच्या सत्रात लोकल धीम्या गतीने धावत होत्या. एल्फिन्स्टन स्थानकाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने त्यादरम्यान लोकल धीम्या गतीने धावल्या.