मुंबई : मुंबईची भौगोलिक स्थिती आणि अपेक्षेहून अधिक झालेला पाऊस म्हणून मुंबईचा खोळंबा झाला, असा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. तसंच मुंबईच्या अवस्थेला फक्त एकटी मुंबई महापालिका जबाबदार नाही, तर सर्वसामान्य मुंबईकर, महापालिका त्यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचाही त्यात वाटा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


प्रश्न - महापौर तुम्ही अंग झटकले आहे. मुंबईकरांना काल त्रास झाला, याला जबाबदार कोण?

उत्तर -  मी अंग झटकले नाही. मी वस्तूस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि आजही करतोय. समुद्राला भरती होती आणि नाल्यांची क्षमता कमी आहे.

प्रश्न - नाल्यांची क्षमता कमी आहे, हे उत्तर देत आहात. पण 2005 साली असाच पाऊस पडला होता, 12 वर्षात का नाही वाढवली नाल्यांची क्षमता?

उत्तर – 2005 ची परस्थिती वेगळी होती. ती पूरस्थिती होती. तेव्हाची आणि कालच्या स्थितीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. काल आम्ही सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र होतो, आपापल्या प्रभागात मदत करत होते. 26 जुलैची तुलना करु नये. पोलीस, प्रशासनचं काम चांगलं होतं.

प्रश्न - मुंबईत नैसर्गिक आपत्ती येते, यासाठी आपण सज्ज असणं तितकंच गरजेचं आहे. जगात मुंबईचं नाव आहे, जगभरातून पर्यटक इथे येतात, मोठ-मोठ्या व्यक्ती इते राहतात, त्यावेळी अशी परिस्थिती आल्यावर निंदा केली जाते.

उत्तर - मुंबईची भौगोलिक परिस्थिती बघा.

प्रश्न - महापौर साहेब किती वर्ष ही कारणं देणार आहात? तुम्ही यंदा महापौर झाले आहात, तुमच्या आधीचे महापौर देखील हीच कारणं देत आले आहेत.

उत्तर - नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते, तेव्हा पूर्वपदावर येण्यासाठी आम्ही जे केलं त्याचं कौतुक केलं पाहिजे. मी स्वतः काल पावसात अडकलो होतो, माझी गाडी अजूनही सांताक्रुझ भागात तिथेच अडकलीय. आरोप करणारे आणि टीका करणारे करतच राहतील.

प्रश्न - पहिल्या पावसात तुम्ही बोललात की पाणी साचलं नाही, दुसऱ्या पावसात तुम्ही बोललात की मेट्रोच्या कामामुळे पाणी साचतंय, आता थेट नैसर्गिक आपत्ती म्हणताय. मग बीएमसीची काहीच जबाबदारी नाहीय का?

उत्तर - जबाबदारी नाहीय असं नाही. पण केलेल्या कामाची प्रशंसा केली जात नाही, जीव धोक्यात घालून काम करतात त्याचे कौतुक केलं पाहिजे.

प्रश्न- नक्कीच कौतुक करायला पाहिजे आणि करतोय पण ही परिस्थिती का यावी? नाले सफाई, नाल्याची क्षमता का नाही झाली?

उत्तर - तुम्ही गल्लत करत आहात. मुंबईत नाल्याची सफाई झाली नसती, तर याधीच पाणी भरलं असतं. काल जे झाले त्याला वैयक्तिक जबाबदार न धरता येणार नाही.

प्रश्न - तुम्ही सांगा मग काल मुंबईत पाणी का भरलं?

उत्तर – पाणी भरण्याला अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे 8 तासात 315 मिमी पाऊस पडला. दुसरं म्हणजे समुद्रालाही भरती होती. आणि तिसरं म्हणजे नाल्याची क्षमता कमी आहे. एकंदरीत भौगोलिक स्थितीही आपण पाहिली पाहिजे.

प्रश्न - काल जी परिस्थिती उद्धभवली, त्याला बीएमसी जबाबदार नाहीय का? एका वाक्यात उत्तर द्या?

उत्तर - जबाबदारी एकावर झटकून चालणार नाही. ही जबाबदारी सार्वजनिक आहे,  तुम्ही आम्ही, बीएमसी, राज्य सरकार, केंद्र सरकार जबाबदार आहेत.