मुंबई : मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते आणि सुकाणू समितीतील सदस्य रघुनाथ दादा पाटील यांनी दिला आहे. सुकाणू समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला. तसेच सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी सुकाणू समितीतील 35 सदस्यांपैकी 15 जणांचं शिष्टमंडळ सरकारच्या मंत्रिगटाची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतील, असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.


मोठ्या मतभेदानंतर संध्याकाळी 4 वाजता सुकाणू समितीच्या बैठकीला आज शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात सुरुवात झाली. या बैठकीला प्रहार संघटनेने सर्वेसर्वा आणि सुकाणू समितीचे सदस्य बच्चू कडू हे अनुपस्थित होते. तर बैठकीकडे डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी पाठ फिरवली होती.

या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना, राजू शेट्टी यांनी अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असं स्पष्ट केलं. तसेच सरकारचं मत जाणून घेण्यासाठी प्रतिनिधी मंडळ उद्या दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथी गृहावर उच्चाधिकार समितीशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दुसरीकडे रघुनाथ दादा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मध्य प्रदेशप्रमाणे आंदोलन करु असा इशारा यावेळी दिला. तर शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलनाचं केंद्र नाशिकच राहणार असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, यावेळी शेतकरी नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. शेकापच्या जयंत पाटल यांनी उद्याच्या बैठकीसाठी 15 जणांचं प्रतिनिधी मंडळ जाणार असल्याचं सांगितलं. यासाठी नावं निवडण्याचा अधिकार राजू शेट्टींना दिला आहे असं सांगितलं. पण यावर रघुनाथ दादा पाटलांनी आक्षेप घेतला. त्यावर राजू शेट्टींनी रघुनाथ दादा पटलांनाच अधिकार द्या, अशी भूमिका घेतली. मात्र जयंत पाटील यांनी रघुनाथ दादा उशीरा आले, असं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला योग्य दिशा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीतीच्या बैठकीपूर्वी मतभेदांमुळे समितीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. या बैठकीला खासदार राजू शेट्टी, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. पण डॉ. गिरधर पाटील, अनिल घनवट, रामचंद्रबापू पाटील आणि डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी बैठकीकडे पाठ फिरवली होती.

या बैठकीवर सुकाणू समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी टीकेची झोड उठवली आहे. बैठकीचं निमंत्रण सर्वांना देण्यात आलं. पण आपल्याला याची माहितीही दिली गेली नाही असं डॉ. पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

समितीवर आक्षेप काय?

सुकाणू समितीतले काही ठराविक लोक परस्पर निर्णय घेतात. तसंच सरकारशी चर्चेची ही योग्य वेळ नाही. शेतकरी आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, मगच चर्चा, असा पहिला ठराव होता.”, असे म्हणत सुकाणू समितीतल्या काही जणांनी आक्षेप घेतला आहे.

डॉ. गिरधर पाटील काय म्हणाले?

“आजच्या सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. किंबहुना, आजच्या बैठकीचं निमंत्रणही दिलं गेलं नाही. पहिल्या बैठकीचीही माहिती सर्वांपर्यंत गेली नाही. मुळात सुकाणू समिती नेमल्याचीही माहिती नव्हती.”, असे डॉ. गिरधर पाटील म्हणाले.

समितीत राजकीय थिल्लरपणा : डॉ. गिरधर पाटील

सुकाणू समितीत राजकीय थिल्लरपणा सुरु असून, समितीने आम्हाला अंधारात ठेवून निर्णय घेतल्याचा गंभीर आरोप समितीचे सदस्य डॉ. गिरधर पाटील यांनी केला आहे.

सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसलेंकडून आरोपांना उत्तर

डॉ. गिरधर पाटील खोट बोलत आहेत. आजच्या बैठकीसाठी आम्ही सगळ्यांना स्वतः फोन केले आहेत, निमंत्रण दिलं आहे असं सांगत सुकाणू समितीचे निमंत्रक राजू देसले यांनी गिरधर पाटलांवर पलटवार केला आहे.

बैठकीतील प्रमुख मुद्दे



  • सुकाणू समितीतील मतभेद भविष्यात टाळण्यासाठी समितीची विभागणी. एक कोअर कमिटी आणि एक व्यापक समिती असेल.

  • समन्वयासाठी कोअर कमिटी आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी व्यापक समिती असेल.

  • शेतकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, ही उद्या मंत्रीगटासोबतच्या बैठकीत आग्रही मागणी असणार

  • जमीन हस्तांतर कायदा आणि समृद्धी महामार्ग यावर ही सरकारकडे चर्चेची मागणी करणार.

  • सातबारा कोरा, हमीभाव, दुधाला योग्य भाव आणि स्वामिनाथन आयोग शिफारसी या मागणीवर ठाम.


LIVE UPDATE :



  •  नाशिकच्या बैठकीत सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिले होते : राजू शेट्टी

  • उद्या सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता चर्चेसाठी सरकारकडून आमंत्रण आलेलं आहे : राजू शेट्टी

  •  बच्चू कडू वगळता बहुतेक सगळे आजच्या बैठकीला उपस्थीत : राजू शेट्टी

  •  12 आणि 13 तारखेचं आंदोलन सुरूच राहील : राजू शेट्टी

  •  शेतकाऱ्यांवरच्या केसेस मागे घ्याव्यात ही आग्रही मागणी : राजू शेट्टी

  •  90 टक्के मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर एवढा भडकाच उडाला नसता : राजू शेट्टी

  •  सरकार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतंय : राजू शेट्टी