नवी मुंबई : कॉलेजमध्ये जायला वडिलांनी बाईक न दिल्याने अकरावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने स्वत:ला पेटवून घेतले असल्याची घटना कळंबोलीमध्ये घडली आहे. शिवम यादव असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. कॉलेजमध्ये जायला गाडी देत नसल्याने शिवमने काॅलेजमध्येच स्वताला पेटवून घेतले. 70 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.


शिवम यादव हा कळंबोली मधील सुधागड कॉलेज मध्ये अकरावीला सायन्समध्ये शिकत आहे. त्याला घरातून काॅलेजला जाण्यासाठी बाईक हवी होती. वडिलांकडे असलेली बाईक तो गेल्या काही दिवसांपासून मागत होता. मात्र काही कारणास्तव वडिलांनी त्याला बाईक द्यायला नकार दिल्याने शिवमला याचा राग आला. याच रागापोटी शिवमने घरातून काॅलेजमध्ये राॅकेल आणत बाथरूममध्ये जावून स्वत:ला पेटवून घेतले. ही बाब इतर विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लक्षात आली. त्यांनी शिवमला लागलेली आग विझवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या शिवमवर ऐरोली येथील बर्न हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तो 70 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.