मुंबई : 'फोनवर दोन मोठ्या नेत्यांमध्ये एखादी चर्चा झाली आणि ती पत्रकारांना समजली, असं काही तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाही' असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार शिवसेना-भाजप युतीबाबत रंगणाऱ्या चर्चांना फटकारलं आहे.


उद्धव ठाकरे हे परिपक्व नेते आहेत. 1995 च्या फॉर्म्युल्याची मागणी ते आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये करतील, असं मला वाटत नाही. या बातम्या कपोलकल्पित असून कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून आल्या आहेत, असं म्हणत मुनगंटीवारांनी 171-117 असं जागावाटपाचं सूत्र शिवसेनेने दिल्याची चर्चा फेटाळून लावली.

जास्तीत जास्त जागा कोणी लढवायच्या यासाठी युती नसते, तर जास्तीत जास्त जागा निवडून आणून जनहिताचे सरकार आणण्यासाठी होते, असंही मुनगंटीवार म्हणाले. युती व्हावी ही तर आमची जाहीर मागणी आहे, आम्ही ती अनेकदा बोलून दाखवली आहे. याबाबत स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. फोनवर तर आमचं रोजच बोलणं होतं, असंही सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेत राहण्याचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापुढे ठेवल्याचं वृत्त होतं. 1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 171 आणि भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं.