मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापुढे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलं आहे. त्यातच विरोधकांनी एकजूट केल्याने भाजपने आता शिवसेनेसोबतच्या युतीच्या हालचालींना वेग दिला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरेंना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली. लोकसभा निवडणुकीपुरताच अमित शाहांचा जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र विधानसभेसाठीही जागावाटप व्हावं, अशी उद्धव यांची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी 1995 च्या जागावाटपाचं सूत्र मांडल्याचं कळतं. 1995 मध्ये शिवसेनेने विधानसभेच्या 171 आणि भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी 138 जागा जिंकून राज्यात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं सरकार स्थापन झालं होतं. परिणामी, जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात युतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असेल.

VIDEO | विधानसभेच्या 150 जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी? | मुंबई | एबीपी माझा 



दरम्यान, युतीसाठी लोकसभेचं जागावाटप कसं असेल, हे अजूनही निश्चित झालेलं नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत सध्या भाजपचे 122 आमदार आहेत. त्यामुळे 1995 च्या जागावाटप फॉर्म्युल्यानुसार भाजप 117 जागा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आपणच मोठा भाऊ आहे, अशी शिवसेनेची भूमिका कायम असल्याने जागावाटपाचा तिढा जैसे थे असाच आहे.