रस्सीखेच खेळताना मुंबईत विद्यार्थ्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 14 Dec 2018 04:09 PM (IST)
रस्सीखेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकत लावली. यावेळी त्याने दोर आपल्या मानेवर घेऊन जोर लावला. खेळ सुरु असतानाच काही कळायच्या आताच जीबीन खाली कोसळला.
मुंबई : रस्सीखेच खेळत असताना अचानक महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात घडली. जीबीन सनी (22)असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. जीबीनच्या अकस्मात मृत्यूने विद्यालयावर विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली आहे. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन झाल्यावर कळणार आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणारा जीबीन सनी हा कॉलेजमधील रस्सीखेच खेळात सहभागी झाला होता. रस्सीखेच सुरू असताना जीबीन याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकत लावली. यावेळी त्याने दोर आपल्या मानेवर घेऊन जोर लावला. खेळ सुरु असतानाच काही कळायच्या आताच जीबीन खाली कोसळला. त्याला कॉलेजच्या सुरक्षारक्षकांनी त्वरित त्याला राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. जीबीन सोमय्या विद्याविहारच्या नर्सिंगचा विद्यार्थी होता. या घटनेबाबत टिळकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.