मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर खुद्द लतादीदींनीच आपली प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.

'नमस्कार, माझ्या प्रकृतीबाबत काही अफवा पसरत आहेत. पण तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. माझी प्रकृती उत्तम असून मी माझ्या घरी आहे' असं लता मंगेशकर यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.


'लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नाही आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.' अशा आशयाचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र या सर्व अफवा असल्याचं लता मंगेशकरांनी स्पष्ट केलं आहे.

लता मंगेशकर यांनी 28 सप्टेंबरला नव्वदीत पदार्पण केलं. लतादीदींना 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. त्यांनी बालवयातच संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरु केली.

लतादीदी संगीत क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चाही गेल्या आठवड्यात रंगल्या होत्या. 'गाणं हा माझा श्वास आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत गातच राहणार आहे. त्यामुळे निवृत्तीचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्न त्यांनी केला. रिकामटेकड्या माणसांनी माझं गाणे आणि निवृत्तीचा खोटा संदेश सोशल मीडियावर पसरवल्याचं त्यांनी म्हटलं होतं.