मुंबई : तब्बल 25 वर्षांनंतर विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका आता थेट महाविद्यालयांच्या रणांगणात रंगणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या संदर्भातील अध्यादेश जारी केला आहे. यंदा किंवा पुढील वर्षापासून या निवडणुका पुन्हा सुरु होतील.

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांना कडक आचारसंहिता आखण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह उमेदवारांना वापरता येणार नसून थेट खर्चावरही लगाम घालण्यात आला आहे.

महाविद्यालयीन निवडणुकांना राजकीय स्वरुप आल्यामुळे आणि हिंसाचाराचे गालबोट लागल्यामुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या. 1991 नंतर गुणवत्तेच्या निकषांवर विद्यार्थी प्रतिनिधींची निवड होत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार प्रतिनिधींची निवड करण्यात येत होती.

आता पुन्हा निवडणुकीनुसार विद्यार्थी परिषद प्रतिनिधींच्या निवडणुका होतील. यासंदर्भात सर्वच विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची मतं विचारात घेऊन उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने अध्यादेश जारी केले आहेत.

नियम आणि अटी

निवडणुकांदरम्यान कडक आचारसंहिता लागू केली जाणार

उमेदवाराला राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्थेचं चिन्ह किंवा बोधचिन्ह वापरता येणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे मेळावे किंवा मिरवणूक काढण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे.

निवडणुका दरवर्षी 30 सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाने पूर्ण कराव्यात, अशी सूचना दिली आहे.

निवडणुकीसाठी विद्यार्थ्याची नेमकी पात्रता काय असेल?

निवडणूक लढवणारा विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा

उमेदवार विद्यार्थ्याला त्यावर्षी एटीकेटी नसावी, तो फेरप्रवेशार्थी नसावा

शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्या विद्यार्थ्याची वयाची मर्यादा 25 वर्ष असावी.