मुंबई: दोन सज्ञान पण समलिंगी व्यक्तींना एकमेकांवर प्रेम करण्याचा अधिकारच नाही, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या दोन तरुणी सध्या स्वत:चं कुटुंब आणि समजाला तोंड देत आहेत.


रेश्मा आणि प्रीती या दोघी पळून जाऊन एकमेकांची सोबत करु लागल्या. मात्र पोलीस आणि कुटुंबाने त्यांना शोधून काढलंच आणि त्यांची ताटातूट केली. 'मुंबई मिरर'ने याप्रकरणाला वाचा फोडली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईत राहणारी 27 वर्षीय रेश्मा मोकेनवार एका कार्यक्रमात दूरची नातेवाईक प्रीती सरकिला भेटली. 20 वर्षीय प्रीती मूळची तेलंगणाची. गेल्या वर्षी दोघी तेलंगणातच भेटल्या. पहिल्याच भेटीत रेश्मा आणि प्रीती एकमेकींच्या प्रेमात पडल्या.

मात्र मुलीने मुलीच्या प्रेमात पडणं हे दोघींच्याही घरच्यांसाठी आभाळ कोसळण्यासारखं होतं. साहजिकच दोघींच्याही घरातून विरोध झाला.

दोघी पळून गेल्या

गेल्या महिन्यात रेश्मा आणि प्रीती शिर्डीला पळून गेल्या. नवं आयुष्य सुरु करण्याच्या हेतूने तिथे त्यांनी हॉटेलमध्ये मोलमजुरी केली. दोघीही हॉटेलमध्येच राहू लागल्या.

मात्र दोघीही अचानक गायब झाल्याने दोघींच्या घरच्यांनी वेगवेगळी पोलीस स्थानकं गाठलं. प्रीती गायब असल्याची तक्रार आल्यानंतर, तेलंगणा पोलीस माग काढत काढत शिर्डीत पोहोचले. पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेऊन, तेलंगणातील आदिलाबादमध्ये नेलं.

इथे कुटुंबियांनी खोटी-नाटी आश्वासनं देऊन, तुम्हाला हवं तसं जगू देऊ, असं सांगून घेऊन गेल्याचं रेश्माने सांगितलं. मात्र पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच, हात मुरगळून आमच्या कुटुंबियांनी आम्हाला वेगवेगळ्या गाडीत घालून घेऊन गेले, असं रेश्मा म्हणाली.

सध्या रेश्मा नांदेडमध्ये कुटुंबाच्या नजरकैदेत आहे. तर प्रीतीला तिच्या कुटुंबीयांनी तेलंगणात आपल्याजवळ ठेवलं आहे.

आम्ही प्रेम केलं, तुमचं काय गेलं?

माझं आणि प्रीतीचं एकमेकींवर प्रेम आहे, आम्हाला आमच्या मर्जीप्रमाणे सोबत राहायचं आहे. पोलीस स्टेशनबाहेर आम्ही आमच्या कुटुंबालाही तसं सांगितलं. आम्ही कुटुंबाला त्रास देणार नाही, कुटुंबापासून दूर राहू, असं रेश्माने सांगितलं.

रेश्मा घटस्फोटित आहे, ती सज्ञान होण्यापूर्वीच तिचा विवाह झाला होता. गेल्या दहा वर्षांपासून ती मुंबईत राहत होती. मेडिकलमध्ये काम करुन ती गुजराण करायची.

दोघींना एकत्र राहू देणार नाही

दरम्यान, दोन मुलींनी एकत्र राहणं ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सोबत राहू देणार नाही. आमच्या कुटुंबात हे घडू देणार नाही, असं रेश्माच्या काकांनी म्हटलं आहे.

जग आम्हाला का स्वीकारत नाही?

आम्ही एका कौटुंबीक कार्यक्रमादरम्यान भेटलो, एकमेकींकडे आकर्षित झालो. हे सगळं नैसर्गिक आहे. मात्र या जगाला त्याची तमा नाही, ते आम्हाला स्वीकारत नाहीत, पण तुम्ही आमचं प्रेम का नाकारताय, असा सवाल रेश्माने विचारला आहे.

कोर्टाचा निर्णय

दरम्यान, समलिंगी संबंधांना सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबर 2015 मध्ये बेकायदेशीर ठरवलं होतं.

मात्र परस्पर संमतीने दोन प्रौढ समलिंगी व्यक्ती एकमेकांसोबत राहात असतील, तर त्याला विरोध का? सोबत राहण्याची त्यांची इच्छा असेल तर तो त्यांना घटनेने दिलेला अधिकार आहे, असं स्वयंसेवी संस्थाचं म्हणणं आहे.